राज्यातील पहिल्यावहिल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची वास्तू उभारून तयार असताना आणि मुख्यमंत्री उद्घाटनासाठी तयार असताना वनखात्यानेच आता त्यात खोडे घालण्याचे ठरवले आहे. 

तीन वर्षांपूर्वी या प्रस्तावित केंद्राला वनखात्यानेच निधीसह झटपट मंजुरी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांत वास्तू उभी केली, पण आता केंद्रात लागणाऱ्या साहित्यासाठी हात आखडता घेतला जात आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष, आणीबाणीचा प्रसंग, शिकारीच्या प्रयत्नात जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर उपचार आणि त्यानंतर पिंजऱ्यात न ठेवता तात्काळ जंगलात सोडण्याच्या उद्देशाने सेमिनरी हिल्सवर प्रस्तावित ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ पूर्णत्वास आले.
भारतात वन्यप्राण्यांवर उपचार करणारी केंद्रे आहेत, पण उपचार करून वन्यजीवांना जंगलात सोडणारे हे राज्यातील पहिले केंद्र आहे. जखमी अवस्थेतील वाघ आणि बिबटे उपचारानंतरही जंगलात न सोडता पिंजऱ्यातच अडकून पडण्याची अनेक उदाहरणे आहेत.
नागपूर आणि आसपासच्या परिसरात कुठेही घटना घडली तरी त्या वन्यजीवाला उपचारासाठी नागपुरातच आणणे आणि सेमिनरी हिल्सवर पडद्याच्या आत त्याच्यावर उपचार करण्याची चुकीची पद्धत गेल्या अनेक वर्षांंपासून सुरू होती. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांच्या संकल्पनेतून साकारलेला ६३ लाख ३८ हजार रुपयांच्या हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. वन्यप्राणी उपचाराकरिता ‘नाईट शेल्टर’ आणि ‘ओपन एन्क्लोजर’ला जोडून असलेला उपचाराचा पिंजरा या केंद्रात असणार आहे. उपचारानंतर वन्यप्राणी या मोकळ्या जागेत फिरू शकतील. हरीण प्रजातीसाठी दोन जुन्या शेडची दुरुस्ती करुन त्याचे पिंजऱ्यात रूपांतर केले आहे. वाघांसाठी उपचाराचे तीन पिंजरे व दोन वाहतूक पिंजरे, बिबटय़ासाठी दोन उपचार पिंजरे व दोन वाहतूक पिंजरे यात असणार आहेत. मात्र, आता या पिंजऱ्यासाठी आणि वन्यप्राण्यांवर उपचारासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी वनखात्याकडे पैसा नाही.
गोरेवाडय़ात ‘रेस्क्यू सेंटर’ होत असताना या ठिकाणी ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची गरजच काय, असा साक्षात्कार आता वनखात्यातील काही अधिकाऱ्यांना होत आहे. राज्यस्तरीय योजनेअंतर्गत पिंजरे आणि साहित्याचा सुरुवातीला ५० लाख रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
दरम्यान, तो कमी करून २५ लाख रुपयांवर आणण्यात आला. तरीही आता वनखात्यातील काही अधिकारी यात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या ठिकाणी सेवा देणारे पशुवैद्यक अधिकारी तयार आहेत, पण उपचारासाठी लागणारे साहित्यच नसल्याने अनेक वन्यजीवांना या ठिकाणी उपचारासाठी आणून उपचाराविनाच परत पाठवले जात आहे.

‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची वैशिष्टय़े
* ४० ७ ६० फुटाचे ओपीडी
* २० ७ २० फुटाचे ऑपरेशन थिएटर
* २० ७ २० फुटाचे पशुवैद्यक कक्ष
* १५ ७ २० फुटाचे फुड स्टोअर
* शवविच्छेदनाकरिता स्वतंत्र खोली
* जखमी वन्यप्राण्यांना घेऊन येणाऱ्या वनकर्मचाऱ्यांसाठी निवास