महाकवी कालिदासाची अजरामर रचना ‘मेघदूत’ जेथे आकाराला आली त्या कालिदासांचा पदस्पर्श झालेला रामटेक परिसर गेले दोन दिवस ट्रेकिंगने गजबजलेला होता. कालिदासांच्या महाकाव्याचे चाहते असलेल्या रसिकांनी या परिसरात ट्रेकिंग करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस आयोजित ट्रेकिंगचा आस्वाद बच्चेकंपनी, युवा आणि विशेष म्हणजे अनेक कुटुंबांनी घेतला.
कवी, चित्रकारांसह वैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ असलेल्या कालिदासांच्या मेघदूतमधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे..’ ही एक काव्यपंक्ती आहे. त्यामुळेच आषाढ महिन्याचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. रामटेकजवळील सिंदुरागिरी पर्वतावर असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या परिसरात कालिदासांनी मेघदूतची रचना केली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या भिंतीवर ही रचना आहे. कालिदास आणि विदर्भाची नाळ या मेघदूतानेच जोडली. त्यातूनच काही वर्षांपूर्वी कालिदास महोत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न झाला, पण अलिकडे या महोत्सवाच्या वाटेतही अनेक अडचणी उभ्या होत आहेत. मात्र, आषाढाचा पहिला दिवस आला की, सर्वाना कालिदासाचे स्मरण होते. ते विस्मृतीत जाऊ नये म्हणूनच आता सीएसी ऑलराउंडर या साहसी संस्थेने पुढाकार घेतला.
कालिदासाचे स्मरण एका दिवसापुरते मर्यादित न राहता कालिदासांच्या स्मृती कायम जिवंत राहाव्यात म्हणून त्यांनी वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. आमदार आशिष जयस्वाल यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमांची सुरुवात त्यांनी २८ व २९ जूनच्या ट्रेकिंगने केली. शनिवार, २८ जूनला सकाळी सीएसीच्या साईटवरून ट्रेकिंगला सुरुवात झाली. त्रिविक्रम मंदिर, कालिदास स्मारक, गडमंदिर, कर्पूरबावडी, सिंधूरागिरी पर्वत अशा ज्या ज्या परिसरात कालिदासांनी वास्तव्य केले, तो संपूर्ण परिसर साहित्य, कला, संस्कृती व निसर्गाबद्दल प्रेम असणाऱ्या रसिकांनी ट्रेकिंग करीत पिंजून काढला. सिंधूरागिरी पर्वतावरून दिसणारा अंबाळा तलाव, खिंडसी आणि या परिसरातील निसर्गदर्शन त्यांनी घेतले. रविवारी, २९ जूनला सायंकाळी सिंधूरागिरी पर्वतावरून ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रेकिंगमध्ये सहभागी रसिकांनी हा संपूर्ण पर्वत पिंजून काढून खिंडसी बॅकवॉटरने सीएसी साईटवर परत आले. दरम्यान, काहींनी कालिदास स्मारकांच्या भिंतीवरील मेघदूताचे वाचन केले. रसिकांच्या ट्रेकिंगच्या उत्साहाला वातावरणानेसुद्धा साथ दिली.