संघटनात्मक पाठबळासोबतच आदिवासी व ओबीसी समाज पाठीशी उभा राहिल्याने येथे भाजपला निर्विवाद यश संपादन करता आले. पक्षांतर्गत गटबाजी आणि या दोन्ही समाजाच्या नाराजीमुळे येथील मतदारांनी जिल्हा कांॅग्रेस-राष्ट्रवादीमुक्त केला आहे. कधी नव्हे इतका दारुण पराभव कॉंग्रेसचा झाला आहे.
कॉंग्रेससोबत राहणारा जिल्हा, अशी गडचिरोलीची ओळख होती, परंतु लोकसभा निवडणुकीनंतर या जिल्ह्य़ात भाजपाने जोरदार मुसंडी मारली. या जिल्ह्य़ातील अहेरी, गडचिरोली व आरमोरी या तिन्ही जागा भाजपने केवळ संघटनात्मक पाठबळावरच पटकावल्या आहेत. अहेरी विधानसभा मतदारसंघात आजवर कधीही निवडून न आलेल्या भाजपने प्रथमच नागविदर्भ आंदोलन समितीसोबत युती करतांना राजे अंब्रिशराव महाराजांना उमेदवारी दिली. त्यांना भाजपा नेत्यांनी दाखविलेल्या विश्वासाचे सोने करून काका व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांचा २० हजाराच्या मताधिक्याने दारुण पराभव केला. येथे आदिवासी मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.
एकाअर्थी हा भाजपचा नाही, तर राजे अंब्रीशराव महाराज यांचा एकहाती विजय म्हणावा लागेल. गडचिरोलीत भाजपचे डॉ.देवराव होळी या तरुणाने ४० हजाराच्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या भाग्यश्री आत्राम यांना, तर कॉंग्रेसच्या सगुणा तलांडी यांना पक्षांतर्गत गटबाजी तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली.
येथे कांॅग्रेसला उमेदवारीतील गोंधळ भोवला. त्याचाच परिणाम सिरोंचातून गडचिरोलीत आलेल्या तलांडी यांना वीस हजारापर्यंतही मजल मारता आली नाही. अहेरीत कॉंग्रेसचे मुक्तेश्वर गावडे ५ हजारापुढे सरकले नाही.
आरमोरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसने डॉ.आनंदराव गेडाम यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने मतदारांनी त्यांना नाकारले, तसेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अरविंद सावकार व प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी कांॅग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केल्याने त्याचाही फटका येथे कॉंग्रेसला बसला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे व कॉंग्रेसचे अन्य नेते प्रचारासाठी घराबाहेरच पडले नाही, तसेच येथे कॉंग्रेसने ऐनवेळी बाहेरचे उमेदवार लादल्याने फटका बसला.
परिणामत: कॉंग्रेसचा राज्यातील एकही बडा नेता या जिल्ह्य़ात न फिरकल्याने कॉंग्रेसचा प्रचारच येथे उभा राहू शकला नाही. तिच गत राष्ट्रवादीचीही झाली.    राष्ट्रवादीचे    नेते     धर्मरावबाबा आत्राम यांना    पक्षाअंतर्गत    गटबाजी   व नाराजी भोवली.