सांप्रदायिक आणि जातीयवादी पक्ष म्हणून अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवरून विरोधक भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. जनसंघाच्या काळापासून पक्ष वाढविण्यासाठी ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांंनी परिश्रम घेतले आहे, त्यांचा सन्मान करा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
भाजपचा स्थापना दिन टिळक पुतळ्याजवळील पक्षाच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ सदस्य बबनराव बढिये, आनंदराव ठवरे, महापौर प्रवीण दटके, शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, उपेंद्र कोठेकर, संजय भेंडे, दयाशंकर तिवारी आदी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना चर्चवर हल्ले करण्यात आले, ख्रिश्चन, दलितांवर अत्याचाराची प्रकरणे वाढल्याचा आरोपही विरोधी पक्षाकडून केला जात आहे. विरोधक भाजपला जातीयवादी आणि सांप्रदायिक पक्ष म्हणून लक्ष्य करीत असतात. विरोधकांकडे आता विषय राहिले नसल्याची टीका गडकरी यांनी केली. पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी लोकसभेत केवळ दोन जागा होत्या. मात्र, त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांंनी घेतलेली मेहनत आणि करण्यात आलेल्या विस्तारामुळे पक्षाला मोठे यश मिळाले आहे. पक्ष प्रत्येक परिवारांशी जोडला गेला आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना संघटितपणे घेतला जातो. काही निर्णय घेताना पक्षाला उशीर होत असला तरी विकास मात्र लवकर केला जातो. काँग्रेसने गरिबी हटावची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात गरिबी वाढली आहे. कोळसा, टूजी स्पेक्ट्रम सारखे अनेक घोटाळे काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही. गेल्या ५० वर्षांंत काँग्रेसने विकासाच्या दृष्टीने जे केले नाही ते ५ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात करण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले. शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या जात आहे. मेट्रो रेल्वेचे काम लवकरच सुरू होईल. मिहानमध्ये लवकरच बैठक घेऊन त्यासंदर्भात कामात गती देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना निर्देश दिले जाणार असल्याचे गडकरी म्हणाले. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांला कुठेतरी स्थान मिळावे. ही अपेक्षा ग्राह्य़ आहे आणि त्यांनी ती करणे अपेक्षित आहे. महामंडळावर किंवा सरकारच्या विविध समित्यांवर नियुक्ती करणे सुरू आहे. त्यात प्रत्येकाला स्थान मिळेलच असे नाही. त्यामुळे निराश न होता पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम करा. देशासाठी ‘अच्छे दिन’ असले तरी लवकरच कार्यकर्त्यांंचे ‘अच्छे दिन’ येतील, असे सांगून पक्षात नाराज असलेल्या कार्यकर्त्यांंना दिलासा दिला.
भाजपचा स्थापना दिन साजरा
टिळक पुतळ्याजवळील भाजपच्या कार्यालयाची प्रशस्त इमारत बांधण्यासाठी कार्यकर्त्यांनी समोर यावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. कार्यकर्त्यांंच्या पैशातून प्रशस्त कार्यालयाची निर्मिती व्हावी यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्यांने कमीत कमी ५१ रुपये आणि जास्तीत जास्त त्यांनी आपल्या ऐपतीने द्यावे, असे आवाहन केले. या पक्षाच्या इमारतीच्या बांधकामासाठी नितीन गडकरी यांनी ५१ हजार रुपये यावेळी जाहीर केले.