टाकळीभान येथील आठवडे बाजारात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या झारखंड येथील दोघा गुन्हेगारांना गावातील तरुणांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्य दोन गुन्हेगार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
सोमवारी टाकळीभानचा आठवडे बाजार होता. दुपारी दोन वाजता एक तरुण बाजारातील किराणा विक्रेत्याकडे गेला. त्याने दीडशे रुपयांची खरेदी करून पाचशेची नोट दिली. ही नोट बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मागील आठवडे बाजारातही या तरुणाने अशाच प्रकारे या विक्रेत्याची फसवणूक केली होती. त्यामुळे या विक्रेत्याने बाजारात या तरुणाचा पाठलाग केला. तसेच गावातील तरुणांना दूरध्वनीवरून माहिती दिली. एका भाजी विक्रेत्याकडे भाजी घेऊन ५०० रुपयांची नोट या तरुणाने दिली. तेव्हा त्याला विक्रेता व गावातील कान्होबा खंडागळे, विलास सपकाळ, प्रशांत नागले, पांडुरंग मगर, गणेश नागले, रवींद्र रणनवरे, अजित शेळके यांनी रंगेहाथ पकडले.
या तरुणाकडे एक हजार रुपयांच्या तसेच पाचशे रुपयांच्या बनावट नोटा होत्या. सुमारे दीड लाख रुपयांच्या नोटा असाव्यात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या तरुणास पकडून पोलीस उपनिरीक्षक महेश क्षीरसागर यांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर एका हलवायाच्या दुकानदाराला त्याच्या साथीदाराने एक हजारची बनावट नोट देऊन खाऊ विकत घेतला होता. तोच पुन्हा भाजीपाला विक्रेत्याकडे हजार रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करत होता. त्यालाही तरुणांनी पकडले. सायंकाळी त्यालाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. बनावट नोटा चलनात आणण्याचा उद्योग त्यांनी मागील आठवडे बाजारातही केला होता. अनेक विक्रेत्यांची फसवणक झाली होती. पण पोलीस तपासाची झंजट नको म्हणून कुणी तक्रार दिली नाही.
बनावट नोटा प्रकरणातील आरोपी हे झारखंड राज्यातील आहेत. पोलिसांनी नुरुद्दीन खुर्शीद शेख (वय ४०) व रेजाउर नुरुद्दीन शेख (वय १९, दोघे रा. पिआरपूर, ता. लादालागोर, जि. साहेबगंज) यांना अटक केली असून न्यायालयाने दि. ९ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्यातील एस. राउल व नजीर शेख हे दोन आरोपी फरार झाले आहेत. तालुका पोलीस ठाण्यात टाकळीभान येथील बाबा इमाम सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. या आरोपींकडील नोटा तपासणीसाठी नाशिक येथील प्रतिभूती मुद्रणालयात पाठविण्यात येणार आहेत.
दोन महिन्यांपासून वास्तव्य
अटक केलेल्या नुरुद्दीन व रेजाउर या दोन गुन्हेगारांचे वास्तव्य शहरातील सुभेदार वस्ती भागात वेश्या व्यवसाय चालतो त्या ठिकाणी होते. ते दोन महिन्यांपासून तेथे चहाचे दुकान चालवत होते. अनेक गुन्हेगारांचे वास्तव्य याच भागात असते. त्यामुळे या गुन्हेगारांकडे कुणीही चौकशी केली नाही. त्यांना चौकशी न करता घरमालकाने घर भाडय़ाने दिले होते. आता या गुन्हेगाराशी संबंध असलेल्या लोकांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.