आपल्या बहिणीच्या विवाहासाठी सगळी तयारी पूर्ण झाली. भावी मेव्हण्यासाठी काही किरकोळ साहित्य खरेदी करण्यास आदल्या दिवशी रात्री तो जिंतूरला गेला. मात्र, परतत असताना वाटेत काळाने घाला घातला. यात त्याच्यासह अन्य एकाचा मृत्यू झाला आणि विवाह सोहळ्यावर एकच शोककळा पसरली.
जिंतूरहून येळीस परत निघालेल्या दोघांचा दुचाकीला ट्रॅक्टरने धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एक हनुमान नामदेव नागरे (वय ७) याच्या मृत्यूने वधूपक्षासह सारेच हळहळले. औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे बुधवारी सकाळी नामदेव नागरे यांच्या मुलीचा विवाह होता. या निमित्त नवरदेवासाठी काही साहित्याची खरेदी करण्यास हनुमान इदारे व हनुमान नागरे हे दोघे दुचाकीवरून मंगळवारी जिंतूरला गेले. तेथून रात्री साडेआठ वाजता येळीला परतत असताना ट्रॅक्टरने या दोघांच्या दुचाकीला रामेश्वर शिवारात धडक दिली. या अपघातात हनुमान इदारे जागीच ठार, तर जखमी हनुमान नागरे याच्यावर परभणीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना तो मरण पावला. जनार्दन नागरे यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.