भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुकामाता मंदिराच्या नूतनीकरणाचे काम प्रगतिपथावर आले आहे. सुमारे १ कोटी रुपये खर्चाचे हे काम आगामी वर्षांत पूर्ण करण्याचा मानस आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या धर्तीवर या मंदिराचे बांधकाम सुरू आहे. अतिशय पुरातन व जागृत म्हणुन हे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवीला तांदुळजा देवी असेही संबोधले. जाते. कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर उक्कडगावजवळ हे मंदिर आहे. गुढीपाडवा, हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा, माघी पौर्णिमा, नवरात्रीला येथे मोठे उत्सव साजरे होतात. याठिकाणी अंधश्रद्धा तसेच बळी देण्याचे प्रकार नाहीत.दोन वर्षांपूर्वी पुणे येथील राज प्लॅनर्सचे संचालक मोहित गंगवाल यांनी मंदिराचा मास्टर प्लॅन तयार केला होता. पुर्ण आरसीसी बांधकाम, दहा हजार स्क्वेअर फुटाचे गर्भगृह, मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, पारायण कक्ष, तीन प्रवेशद्वारे, तीस मीटर उंचीचा कळस बागबगीचा केला जाणार आहे. श्री रेणुकामातेची मूर्ती आहे तशीच ठेवून मंदिराचे जुने बांधकाम पाडण्यात आले. मंदिराच्या या जिर्णोध्दारासाठी भाविकांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे. मंदिराचा तिर्थविकास आराखडय़ात क वर्गात समावेश करण्यात आला आहे. आमदार अशोक काळे, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, युवक नेते बिपीन कोल्हे आदींचे सहकार्य लाभले आहे.