ठाणे जिल्ह्य़ातील अतिशय वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या गरजेसाठी प्रस्तावीत करण्यात आलेली पोशीर, काळू, आणि शाई आदी धरणे अद्याप कागदावरच असल्याने भविष्यकालीन पाणीपुरवठय़ासाठी सध्या एकमेव पर्याय असणाऱ्या उल्हास नदी संवर्धनाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून सध्या यासंदर्भात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कर्जत ते वसई असे तब्बल १३५ किलोमीटर लांबीची ही नदी भिवपुरी येथील जलविद्युत प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे पाणी सोडले जात असल्याने बारमाही वाहती आहे. मात्र कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यातील औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी पुरेशी प्रक्रिया न करता थेट पात्रात सोडले जात असल्याने सध्या या नदीतील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे किमान बदलापूर शहरातील सांडपाण्याने ही नदी प्रदूषित होणार नाही, या उद्देशाने नदी सवंर्धन मोहीम हाती घेतली जात असून त्यास केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान मिळणार आहे.
बदलापूर शहरास तीन किलोमीटर लांबीचा उल्हास नदीकिनारा लाभला आहे. या तीन किलोमीटरच्या प्रवासात सध्या तीन ठिकाणी नाल्यांचे पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्यातील एक नाला औद्योगिक विभागातील तर उर्वरित दोन नाले घरगुती सांडपाणी वाहून आणतात. शहरात भुयारी गटार योजनेचे काम अद्याप सुरू असल्याने सध्या कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जाते. नदी संवर्धन मोहिमेत या तिन्ही नाल्यांवर शुद्धीकरण प्रकल्प बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरातील नदीकिनारी असलेल्या दोन स्मशानभूमींत डिझेल शवदाहिनी बसवून राखेपासून होणारे प्रदूषण रोखले जाणार आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त बरेचसे नदीपात्र कोरडेच असते. त्या भागात पाऊसपाणी संकलन करून भूगर्भजलाची पातळी वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी तीस मीटरवर जलसंवर्धन खड्डे खोदले जाणार आहेत. नदीकिनारी मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. अनंत इनामदार हे जलशुद्धीकरण विषयातील तज्ज्ञ सध्या या प्रकल्पासाठी नदी परिसराचे सर्वेक्षण करीत असून लवकरच राज्य शासनाच्या पर्यावरण विभागास अहवाल सादर केला जाणार आहे. राज्य शासनाच्या वतीने केंद्रीय पर्यावरण विभागाकडे हा प्रस्ताव जाऊन त्यानंतर रीतसर मंजुरी मिळून काम सुरू होणार आहे. कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.
इतर शहरांनीही करावे अनुकरण
 उल्हास नदीच्या बदलापूरमधील या शुद्धीकरण प्रकल्पासाठी ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील ७० टक्के निधी केंद्र शासन अनुदान म्हणून देईल. उर्वरित ३० टक्के रक्कम राज्य शासन तसेच पालिकेला उभी करावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील शहरी विभागांना पाणीपुरवठय़ासाठी सध्या हा एकमेव पर्याय असल्याने केवळ बदलापूरच नव्हे तर त्यापुढील अंबरनाथ, उल्हासनगर तसेच कल्याण या शहरांनीही उल्हास नदी संवर्धन योजना राबविणे आवश्यक असल्याचे मत नदी संवर्धन मोहिमेतील जाणकार जी.डी. जोशी यांनी व्यक्त केले आहे.
उल्हासचे पाणी वापरणारी शहरे
बोरघाटात उगम पावत असली तरी कर्जतनंतर उल्हास नदीच्या खोऱ्यास सुरुवात होते. बदलापूर येथील बॅरेज बंधाऱ्यावर या नदीचे पाणी अडवून तिथून अंबरनाथ तसेच बदलापूर शहरांना पाणीपुरवठा केला जातो. पुढे शहाडजवळ या नदीवर आणखी एक बंधारा असून तिथे अडविलेल्या पाण्याचा वापर भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, भाईंदर येथील पाणीपुरवठय़ासाठी होतो. तसेच या परिसरातील औद्योगिक विभागासाठीही याच नदीचे पाणी वापरले जाते. तसेच उल्हास आणि बारवी नदीच्या संगमावर एमआयडीसीमार्फत पाणी उपसले जाऊन ते डोंबिवली, नवी मुंबई औद्योगिक विभागासाठी तसेच उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे येथे अंशत: पिण्यासाठी पुरविले जाते.