मध्य प्रदेशच्या इंदूरच्या पोलिसांनी सोलापुरातून दोन संशयित दहशतवादी तरूणांना अटक केल्यानतर त्यापैकी उमेर अ. हाफिज दंडोती याच्या वडिलांनी आपला मुलगा निष्पाप असून त्यास इंदूर पोलिसांनी फसवून खोटय़ा गुन्ह्य़ात गुंतविल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी शहराचे पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांना सादर केले आहे.
दंडोती याचे वडील अ. हाफिज दंडोती हे सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील निवृत्त सहयोगी अधिव्याख्याते (तंत्र अभियांत्रिकी विभाग) आहेत. तीन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा उमेर हा वातानुकूलित यंत्र  दुरूस्तीचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) प्रशिक्षण घेऊन स्वत: मेकॅनिकल वर्कशॉप चालवितो, असे दंडोती यांचे म्हणणे आहे.
गेल्या मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास दंडोती हे आपल्या घरात कुटुंबीयांसह जेवण करीत असताना मुलगा उमेर यास कोणाचा तरी मोबाइल आला. त्यामुळे तो घरातून बाहेर पडला. नंतर काही क्षणातच धाकटा मुलगा उसेद याने, भाऊ उमेर यास दोन पोलीस कर्मचारी मोटारसायकलवर बसवून नेल्याची माहिती घरात येऊन सांगितली. त्यानुसार आपण तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलासंबंधी चौकशी केली असता पोलिसांनी कोणतीही माहिती न देता चौकशीअंती मुलाला घरी पाठविले जाणार असल्याचे सांगितले. परंतु रात्री उशिरा मुलगा घरी परत येण्याची प्रतीक्षा केली असता अखेर मध्यरात्री दीड वाजता पोलिसांनी आपल्या घरी येऊन आपली पत्नी शमशादबी हिच्या नावे साध्या कागदावर लिहिलेले पत्र देऊन मुलगा उमेर यास अटक केल्याची सूचना दिली. मध्य प्रदेशच्या सेंधवा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विस्फोटक पदार्थ अधिनियम कायद्यान्वये गुन्ह्य़ात अटक केल्याचे पत्रात नमूद केले होते.
दुसऱ्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रांतून मुलगा उमेर यास राहत्या घरातून विस्फोटक साठय़ासह पकडण्यात आल्याची माहिती प्रसिध्द झाल्याचे पाहून आम्हा सर्वानाच मानसिक धक्का बसल्याचे दंडोती यांनी पोलीस आयुक्तांना सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे. वास्तविक पाहता मंगळवारी, २४ डिसेंबर रोजी कोणीही पोलीस आपल्या घरात झडती किंवा चौकशीसाठी आले नव्हते. मुलगा उमेर याचा कोणत्याही व कधीही गुन्ह्य़ाप्रकरणी साधे नावसुध्दा आले नाही. आपले संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित व समाजात प्रतिष्ठित म्हणून ओळखले जाते. मात्र मध्य प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आपला मुलगा उमेर यास खोटय़ा व गंभीर गुन्ह्य़ात गुंतवून फसवणूक केल्यामुळे मध्य प्रदेश एटीएसचे पोलीस अधीक्षक मनीष खत्री व त्यांच्या सहकाऱ्यांविरूध्द कारवाई करावी, अशी मागणी दंडोती यांनी केली आहे.
दरम्यान, आपली बाजू मांडण्यासाठी दंडोती व लुंजे कुटुंबीयांनी उद्या शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजिली असून यात आपली मुले कशी निष्पाप आहेत व त्यांना पोलिसांनी दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्य़ात खोटेपणाने कसे गुंतविले आहे, यासंबंधी म्हणणे मांडणार आहेत.