कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस असलेल्या पोलीस चौकीसभोवती असलेले कुंपण प्रवाशांना अडचणीचे ठरत असूनही ते हटविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी करूनही संबंधित यंत्रणेला चर्चेसाठी वेळ नसल्याचे सांगण्यात येत आहे. पालिका, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त बैठकीद्वारे मार्ग काढण्यासाठी आमदारांनी बैठक बोलविण्याबाबत केलेल्या विनंतीलाही प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद देण्यात आलेला नाही. परिणामी, कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ रिक्षाचालकांची दंडेली कायम असून ‘नो पार्किंग’ फलकासमोर लागलेल्या दुचाकींमुळे प्रवाशांना मार्ग काढणे कठीण झाले आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेली बीट चौकी ही अनधिकृत असल्याचे पालिकेच्या ‘एल’ विभागाच्या सूत्रांनी सांगितले. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी संबंधित प्रभागातील तीनही नगरसेविका, पालिकेचे एल विभागाचे सहाय्यक आयुक्त, वाहतूक पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांची संयुक्त बैठक बोलाविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त राठोड यांच्या दालनात बैठक बोलाविण्याबाबत पत्र पाठविण्यात आले. बैठक ज्या दिवशी बोलाविण्याचे निश्चित झाले त्याच्या एक दिवस अगोदर राठोड हे रजेवर निघून गेले. मात्र संबंधित बैठक रद्द झाल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृतपणे काहीही कळविण्यात आले नाही.
चौकीच अनधिकृत असल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत असले तरी ती चौकीही हटविण्याबाबत पालिकेकडूनच कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या कुंपण काढण्याबाबतची कारवाई सोडा, चर्चाच होत नसल्याने प्रवाशांचा त्रास कायमच आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची
ताठर भूमिका
नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश भवर यांच्या म्हणण्यानुसार ही चौकी आणि त्याचे कुंपण याचा कोणालाही त्रास होत नसून त्याच्या साहाय्याने व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली तरी समस्या सुटू शकते. या कुंपणाची कोणाला अडचण होत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. आम्ही हे कुंपण काढू देणार नाही, अशी ताठर भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र पोलीस चौकीसमोर कुंपणावर लावलेल्या ‘नो पार्किंग’ फलकाच्या समोरच लागणाऱ्या दुचाकींवर कारवाई करण्याबाबतही ते असमर्थ असल्याचे दाखविल्यानंतर ती जबाबदारी वाहतूक विभागाची असल्याचे त्यांनी सांगितले.