आजच्या जगात केवळ उच्चशिक्षण घेऊन उपयोग नाही. त्यासाठी गरज आहे योग्य त्या प्रशिक्षण आाणि समुपदेशनाची. ऐरोली येथे यासाठी वर्षभर चालणारे कायमस्वरूपी खासगी रोजगार आणि समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले असून या उपक्रमातून आतापर्यंत सात हजार ५५४ बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. गुरुवारी नवी मुंबई रोजगार, उद्योग आणि व्यापार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअरमध्ये दोन हजार ३८७ रोजगारांच्या हातांना काम मिळाल्याने बेरोजगारांच्या पंखात बळ आले आहे.
बेरोजगारी ही निरंतर प्रक्रिया आहे. देशाच्या सैन्य दलात हजारो पदे आजघडीला रिक्त असून शासनही लवकर मेघा नोकर भरती करणार आहे. खासगी क्षेत्रातही अनेक पदांवर रोजगार उपलब्ध आहे. मात्र योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक तरुणांना आपल्या आयुष्यात नोकरीच्या बाबतीत केवळ तडजोड करावी लागत आहे. या कामासाठी लागणारे कौशल्य अनेक सुशिक्षित बेरोजरांच्या जवळ नसल्याने हाता-तोंडाशी आलेली नोकरी गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. हाच धागा पकडून आमदार संदीप नाईक यांनी ऐरोली सेक्टर सहा येथे एक कायमस्वरूपी रोजगार प्रशिक्षण व समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी बेरोजगारांनी आपला बायो डेटा दिल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडत्या नोकरीसाठी करावी लागणारी तयारी करून घेतली जाते. त्यासाठी मुलाखतीला कोणते कपडे घालावे इथपासून ते मुलाखतीत येणाऱ्या संभाव्य प्रश्नांची माहिती दिली जात आहे. या कामासाठी काही खासगी कौन्सिलर नेमण्यात आले आहेत. रोजगार मेळावा व या प्रशिक्षण तसेच समुपदेशन केंद्रातर्फे चार वर्षांत सात हजार ५५४ बेरोजगारांना नोकऱ्या दिल्याचा दावा केला जात आहे.
त्याचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवला गेला आहे. यासाठी नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पाताळगंगा, रसायनी, तळोजा येथे असणाऱ्या कंपन्यांबरोबर संपर्क साधला जात आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार त्यांना या खासगी रोजगार केंद्राच्या वतीने कर्मचारी अधिकाऱ्यांचा पुरवठा केला जात आहे. गेली चार वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे.
त्यासाठी नाईक यांनी स्वत: अनेक कंपन्याच्या मालकांशी तसेच व्यवस्थापनांशी बैठका घेतल्या आहेत. कुशल कामगार मिळत नसल्याने अनेक कंपन्या त्रस्त असल्याची माहिती या संपर्कातून उपलब्ध झाली. त्यानंतर या खासगी रोजगार व प्रशिक्षण, समुपदेशन केंद्राचा जन्म झालेला आहे. त्यामुळेच १० जानेवारी २०१२ रोजी घेतलेल्या पहिल्या जॉब फेअर क्रार्यक्रमात एक हजार ३०० जणांना नोकरीचे हमीपत्र मिळाले आहे. त्यानंतर सात ऑगस्ट २०१२ रोजी दुसऱ्या रोजगार मेळाव्यात एक हजार ५०० कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला आहे. गुरुवारी झालेल्या महामेळाव्यात सात हजार बेरोजगारांनी हजेरी लावली त्यातील दोन हजार ३८७ बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
या जॉब फेअर आणि ३६५ दिवस चालणाऱ्या रोजगार केंद्रातून सात हजार बेरोजगारांना नोकऱ्या लावल्याचे समाधान मिळत असल्याचे नाईक यांनी सांगितले. ‘नोकरी एक्स्प्रेस’सारखी सवंग लोकप्रियतेची गाडी फिरवली जात असताना कोणताही गवगाव न करता गेली चार वर्षे हे काम केले जात आहे. राजकरणाच्या पलीकडे जाऊन केवळ सामाजिक बांधिलकीतून हे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.