ठाणे जिल्ह्य़ातील आरोग्य विभागात राबविण्यात येत असलेले बदल्यांचे धोरण अन्यायकारक असून या संदर्भात सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवली आहे. या अन्याय धोरणाचा फेरविचार न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दिला आहे.
जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील सर्वसाधारण व प्रशासकीय विनंती बदली प्रक्रिया १२ मे रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत बदलीची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाली नव्हती.
वस्तुत: आधी यादी प्रसिद्ध करून मगच शासन निर्णयानुसार कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र आरोग्य खात्याने ज्येष्ठता यादीविना १२ मे रोजी बदल्यांसाठी समुपदेशन असल्याचे जाहीर केले. परिणामी, कोणत्याही संवर्गाचा कर्मचारी रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे बदली प्रक्रिया पुन्हा राबवून कर्मचाऱ्यांना किमान दहा दिवसांचा अवधी द्यावा, त्यासाठी ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकाव्यात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तेवढय़ासाठी जिल्हा परिषदेत यावे लागणार नाही, असे कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे म्हणणे  आहे.