परीक्षेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या चार केंद्र प्रमुखांना परीक्षा मंडळाने (बीओई) एका वर्षांसाठी ‘डीबार’ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिबा व्हॅल्सन, डॉ. गीता सिंग, ए.टी. बोरकर आणि एस.डी. नाईक अशी डीबार करण्यात आलेल्या प्राध्यापकांची नावे आहेत. हल्ली चुकीच्या दिवशी प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा उघडून विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत. या पाश्र्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याचे सुतोवा नुकत्याच होऊन गेलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत करण्यात आले. शिस्तपालन कृती समितीने (डीएसी) चार केंद्रावरील प्रकरणांचा अहवाल बीओईकडे सादर केला. बीओईने तो मंजूर करून केंद्र प्रमुखांना कठोर शिक्षा करण्याचे धारिष्टय़ पहिल्यांदाच दाखवले आहे.
विद्यापीठाने ९८व्या दीक्षांत समारंभामुळे २६ नोव्हेंबरला पेपर पुढे ढकलला. त्यासाठी चार नोव्हेंबरला अधिसूचना जारी केली होती. मात्र, मनोरमा मुंडले आर्किटेक्ट महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर केंद्राधिकारी शिबा व्हॅल्सन यांनी ठरलेल्या दिवशी पेपर घेऊन उत्तरपत्रिका विद्यापीठात पोहोचण्याची व्यवस्थाही केली. उत्तर नागपुरातील राजकुमार केवलरामानी कन्या महाविद्यालयात बी.कॉम. प्रथम वर्षांचा (आवश्यक इंग्रजी) पेपर १५ नोव्हेंबर होता. तो एक महिन्यापूर्वीच १९ ऑक्टोबरला केंद्र प्रमुख डॉ. गीता सिंग यांनी उघडला. मात्र, प्राचार्याना त्याची कल्पना दिली गेली नव्हती. इतरांकडून प्राचार्याना माहिती मिळाल्यावर त्यांनी ताबडतोब विद्यापीठाला कळवले. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीत एमबीएचा ‘विपणन व्यवस्थापना’चा दुसऱ्या सत्राचा पेपर २७ मे रोजी उघडून वाटण्यात आला आणि तो लागोलाग परत घेण्यात आल्या. त्याठिकाणी ए.टी. बोरकर हे केंद्राधिकारी होते. उपरोक्त या तीनही घटना २०११मधील उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेसंबंधीच्या होता. चौथी घटना उन्हाळी २०१२च्या परीक्षेतील रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर घडली. तेथे प्राध्यापक एस.डी. नाईक हे केंद्राधिकारी होते. ५ मे रोजी ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्ड’ या विषयाचा चौथ्या सत्राचा पेपर त्यांनी १० दिवसांपूर्वी २५ एप्रिलला उघडला. बोरकर आणि नाईक यांनी नकळत चूक झाल्याचे डीएसीकडे कबूल केले होते. मात्र, ‘इग्नोरन्स हॅज नो एक्सक्युज’ या उक्तीप्रमाणे चौघांनाही बीओईने एका वर्षांसाठी परीक्षेच्या कामापासून वंचित ठेवून त्यांना देण्यात आलेले किंवा देण्यात येणारे मानधन परत घेण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात डीएसीचे अध्यक्ष डॉ. एकनाथ कठाळे यांच्याशी संपर्क साधला असता परीक्षा मंडळाच्या निर्णयामुळे विद्यापीठाच्या परीक्षांना सहजपणे घेणाऱ्यांवर चाप बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. कठाळे म्हणाले, एक पेपर रद्द होणे म्हणजे प्रत्येक परीक्षा केंद्रावरील हजारो पेपर परत बोलवावी लागतात आणि नवीन प्रश्नपत्रिकांची छपाई करावी लागते. त्यासाठी लाखो रुपयांचा भरूदड विद्यापीठाला सहन करावा लागतो. शिवाय विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास मोठा असतो. डीएसीच्या कामात अध्यक्षांसह डॉ. उर्मिला डबीर, डॉ. एन.आर. दीक्षित, डॉ. भाऊ दायदार आणि वध्र्याचे डॉ. ए.जी. पावडे या सदस्यांचे सहकार्य लाभले.