सलग पाच दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा ९७ गावांतील २८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी पावसाने काहीशी उघडीप घेतली असली, तरी दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. यामुळे कोणत्याही क्षणी तो कोसळण्याची धास्ती कायम राहिली. पाच दिवसात वीज पडून एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. शेकडो घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जानेवारी महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट केली. सलग चौथ्या महिन्यात आणि ऐन उन्हाळ्यात नैसर्गिक संकटांची ही मालिका थांबलेली नाही. ९ ते १३ एप्रिल या कालावधीत सलग पाच दिवस पावसाने हजेरी लावली. त्यात सोमवारी पाऊस व गारपिटीने जोरदार तडाखा दिला. मागील पाच दिवसांत जिल्ह्यात ५६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ९७ गावांना त्याचा फटका सहन करावा लागला. या भागातील २८०७ हेक्टरवरील डाळिंब, कांदा, हरभरा, गहू व मोसंबीसह इतर पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या २५१४ आहे. शनिवारी आणि सोमवारी पावसाने सर्वाधिक नुकसान केले.
दर महिन्याला नैसर्गिक आपत्तीत हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांचा आकडाही दिवसागणीक वाढत आहे. गुरुवारच्या पावसाने १६ घरांचे नुकसान झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आठ घरांचे नुकसान झाले. शनिवारी नुकसानीचा आकडा वाढला.
वीज पडून एक व्यक्ती जखमी झाली. तीन मोठी आणि १० लहान जनावरे मृत्युमुखी पडली. १५३ कोंबडय़ा मृत्युमुखी झाल्या. १७४ घरांचे नुकसान झाले. एक पोल्ट्री फार्म आणि एका कांदा चाळीचे नुकसान झाल्याची नोंद आहे. रविवारी पावसाचे प्रमाण तुलनेत कमी होते. या दिवशी एक म्हैस मरण पावली. सोमवारी वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. २५ घरांचे नुकसान झाले.