उरण विधानसभा मतदारसंघात एकूण २० मतदारसंघ संवेदनशील असून भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संवेदनशील मतदान केंद्रांवर निरीक्षण ठेवण्यासाठी २० मायोक्रोऑबझ्ॉरव्हर तसेच या प्रत्येक केंद्रावर व्हिडीओ कॅमेरे पुरविण्यात येणार असल्याची माहिती उरण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये उरण तालुक्यात १७ केंद्रे, पनवेलमध्ये दोन तर खालापूरमध्ये १ मतदान केंद्राचा समावेश आहे.
बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी उरण निवडणूक निर्णय विभागाने आपली तयारी पूर्ण केली आहे. यामध्ये प्रामुख्याने संवेदनशील मतदान केंद्रांवर मतदारांना मतदान शांततेत करता यावे याकरिता बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या संवेदनशील मतदान केंद्रांत उरणमधील नवघर जेएनपीटी कॉलनी २, केगांव एनएडी,नागरी संरक्षण समूह कार्यालय बोरी, रोटरी स्कूल बोरी, उरण एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल,सिटीझन प्रायमरी स्कूल, उरण, कोकण ज्ञानपीठ कॉलेज, एनआय हायस्कूल २, सेंट मेरी स्कूल ३ ,द्रोणागिरी हायस्कूल करंजा २, राजिप शाळा मोरावे -पनवेल १, कर्नाळा डोलघर १,वासांबे जनता विद्यालय मोहपाडा खालापूर १ यांचा समावेश आहे. यावेळी मतमोजणी जीटीपीएस कामगार वसाहत सभागृह -बोकडवीरा येथे करण्यात येणार असून सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार असल्याचीही माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.