ठाणे शहरातील नागरिकांना मोनो-मेट्रोसारख्या मोठय़ा प्रकल्पांचे गाजर दाखविणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) वर्षांनुवर्षे कागदावर असलेले हे प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा सुसाध्य नाहीत, असा कांगावा एकीकडे सुरू केला असताना दुसरीकडे वडाळा-घाटकोपर-मुलुंड या मुंबईतील नियोजित मेट्रो प्रकल्पाचा विस्तार ठाण्यातील तीनहात नाका तसेच घोडबंदर मार्गापर्यंत करता येईल का, याची नव्याने चाचपणी सुरू केल्याने ‘एमएमआरडीए’च्या स्वप्नातला हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरेल का, याविषयी ठाणेकरांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ठाणे, भिवंडी, कल्याण यांसारख्या शहरांसाठी यापूर्वी आखलेले मोनो, मेट्रोचे संयुक्त प्रकल्प आर्थिक कारणे पुढे करून गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. असे असताना वडाळा-घाटकोपर-मुलुंड या कागदावर असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्याची योजना आखून एमएमआरडीएने ठाणेकरांपुढे नवे गाजर पुढे केल्याची चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली आहे. ठाण्यातील वाहतूक सुसह्य़ व्हावी यासाठी एमएमआरडीए तसेच महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पांच्या घोषणा होत असून गेल्या दहा वर्षांपासून मोनो-मेट्रो आणि आता ट्रामगाडय़ांची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मोठमोठय़ा प्रकल्पांच्या घोषणांपलीकडे ठाणेकरांच्या पदरात प्रत्यक्षात मात्र काहीच पडत नाही, असेच एकंदर चित्र आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई शहरात वेगवेगळ्या विकास प्रकल्पांसाठी कोटय़वधी रुपयांचा रतीब मांडला जात असताना ठाणे तसेच आसपासच्या शहरांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची ओरड यापूर्वीही अनेकदा झाली आहे.
२ एमएमआरडीएच्या घोषणा कागदावरच
ठाणे शहरातील वाहतूक  व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने गेल्या १५ वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकल्पांच्या घोषणा होत आहेत. एमएमआरडीएने शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आखलेल्या मोनो-मेट्रो प्रकल्पांना आर्थिक असाध्यतेचा खोडा बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे शहर तसेच घोडबंदर पट्टय़ाचा झपाटय़ाने होणारा विकास लक्षात घेऊन एमएमआरडीएने ठाण्यात कोणत्या मार्गावर मेट्रो रेल्वे सुरू करता येईल, याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले होते. ठाण्यातील सुमारे १२ लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी एकमेव रेल्वे स्थानक अस्तित्वात असून या भागातून घोडबंदर मार्गाकडे जाणारी मेट्रो सेवा सुरू करता येईल का, याची चाचपणी करण्यात आली होती. यासाठी महानगर विकास प्राधिकरणाने मेसर्स कन्सल्िंटग इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने रेल्वे स्थानक, तीनहात नाका, कापूरबावडी-कासारवडवली (घोडबंदर) या मार्गावरील नियोजित मेट्रो मार्गाचा सविस्तर अहवाल एमएमआरडीएला सादर केला केला. या प्रकल्पासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा खर्च येईल, असा अंदाजही ठरविण्यात आला आहे. सुमारे १०.८७ किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पात रेल्वे स्थानकापासून घोडबंदर मार्गापर्यंत ११ स्थानके निश्चित करण्यात आली. मात्र, या अहवालात प्रकल्पाचे बांधकाम तसेच त्यामधून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा सुसाध्य नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या प्रकल्पातील आर्थिक गणित पाहता बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावरही हा प्रकल्प राबविणे शक्य नसल्याने इतर काही मार्गाने निधी उपलब्ध करता येईल का, याची चाचपणी महानगर विकास प्राधिकरणाने सुरू केली आहे.
२ नव्या शक्यतांचा अभ्यास
जुन्या घोषणा कागदावर असताना एमएमआरडीएने आता वडाळा-घाटकोपर-मुलुंड या प्रस्तावित मेट्रो मार्गाचा ठाण्यापर्यंत विस्तार करता येईल का, याचा अभ्यास सुरू केला आहे. ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्ग आर्थिक कारणे पुढे करून गुंडाळल्यात जमा असताना मुंबईतील मेट्रो प्रकल्पांचा विस्तार ठाण्यापर्यंत करून दुधाची तहान ताकावर भागावता येईल का, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईत एमएमआरडीएने नऊ मेट्रो मार्गाची घोषणा केली असली तरी त्यापैकी बरेचसे कागदावर आहेत. वडाळा-घाटकोपर-मुलुंड हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे. त्यामुळे मूळ प्रकल्प अधांतरी असताना त्याचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्याच्या गमजा मारून एमएमआरडीएने येथील रहिवाशांपुढे नवे गाजर पुढे केल्याची टीका येथील लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.