तरीही गुण्यागोविंदाने

पहिली भेट – आम्ही दोघेही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखतो. म्हणजे मी ९वीत आणि ती ६वीत असल्यापासूनच आमची ओळख आहे.

स्वरूप-रोशनी भालवणकर (संगीतकार-गीतकार)
* पहिली भेट – आम्ही दोघेही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखतो. म्हणजे मी ९वीत आणि ती ६वीत असल्यापासूनच आमची ओळख आहे. तिचे वडील लष्करात अधिकारी आणि माझे वडील मुंबई पोलिसांत अधिकारी! त्या वेळी ओळख असली, तरी प्रत्यक्ष प्रेमात पडलो, ते त्यानंतर अनेक वर्षांनी. मध्यंतरीच्या काळात रोशनीच्या वडिलांच्या बदल्या होत असल्याने ती भारतभर फिरत होती. मी मिठीबाई कॉलेजमधून माझं शिक्षण पूर्ण करत होतो. शिक्षणानंतर संगीतात करिअर करायचं ठरवलं. सुदैवाने माझ्या पहिल्याच आल्बमला चांगला प्रतिसाद मिळाला. त्या आल्बमच्या प्रमोशनसाठी पुण्यात एका एफएम चॅनलवर गेलो असता पुन्हा रोशनीची भेट झाली. ती भेट प्रेमात पाडणारी पहिली भेट होती.
*  एकच क्षेत्र कसं वाटतं? – एकाच क्षेत्रात काम करणं हा खूपच सुखद अनुभव आहे. माझ्या चाली, माझी स्वररचना यांचा अचूक अंदाज रोशनीला आहे. त्याचप्रमाणे तिच्या प्रतिभेचा पल्ला मला माहीत आहे. आजकाल तर तिच्या गाण्यांव्यतिरिक्त इतर कोणतेही गाणे स्वरबद्ध करताना थोडा त्रास होतो, एवढी सवय झाली आहे. तसेच एखादे वेळी रोशनीला मध्यरात्री शब्द सुचले किंवा मला वेळी-अवेळी चाल सुचली, तर आम्ही एकमेकांसाठी तत्पर असतो.
*  व्हॅलेण्टाइन डेचा प्लॅन – आम्ही दोघेही सतत एकमेकांबरोबरच असतो. त्यामुळे व्हॅलेण्टाइन डेसाठी काही खास प्लॅन केलेला नाही. आमच्यासाठी रोजचा दिवस व्हॅलेण्टाइन डे असतो. दर दिवशी काम आणि दर दिवशी मजा, असे आमचे समीकरण आहे.
शशांक केतकर-तेजश्री प्रधान (अभिनेता-अभिनेत्री)
* पहिली भेट – मी तेजश्रीला पडद्यावर पाहिले होते. पण आमची प्रत्यक्षातील पहिली भेट ही ‘होणार सून मी ह्य़ा घरची’च्या सेटवरच झाली. पहिल्या भेटीत प्रेम वगैरे जमण्याचा बालिशपणा आमच्या बाबतीत नक्कीच झाला नाही. पहिली भेट विचाराल, तर सेटवर झालेली तीच पहिली भेट.
* एकच क्षेत्र कसं वाटतं? – प्रेमात पडण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी दोन व्यक्तिंनी एकमेकांना ओळखणे जास्त गरजेचे आहे. दोघांनीही एकमेकांना ओळखले की, मग त्या दोन व्यक्ती कोणत्या क्षेत्रात काम करतात, याला फारसे महत्त्व उरत नाही. आमच्या बाबतीत तर अनेकांना हे कुतूहल वाटते. पण अशा अनेक जोडय़ा इंडस्ट्रीमध्ये आहेत. नुसत्या आहेत नाही, तर अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. वास्तविक आमच्या क्षेत्रात जोडीदारासाठी वेळ देणे, हे एक आव्हान असते. मग एकाच क्षेत्रात काम केल्याने आम्हाला तो वेळ आयता मिळत असेल, तर चांगलेच आहे ना!
* व्हॅलेण्टाइन डेचा प्लॅन – अगदी गेल्याच आठवडय़ात आमचे लग्न झाले आहे. किंबहुना लग्नाला अजून आठवडाही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे व्हॅलेण्टाइन डे अतिशय खास असणार, एवढे नक्की! दोघांनीही एकमेकांसाठी खूप सारी सरप्राइझेस प्लॅन केली आहेत. आता ती सरप्राइझेस असल्याने आत्ताच त्याबद्दल सांगणे कठीण आहे. पण दोघेही एखाद्या शांत स्थळी जाणार आहोत, एवढे नक्की!
अजय कांबळे-निर्मला पवार (प्राध्यापक)
*  पहिली भेट – आम्ही दोघेही एकाच महाविद्यालयात होतो. त्यामुळे पहिली भेट तिथेच झाली. पुढे आवडीनिवडी, विचार वगैरे सगळेच जुळत असल्याने रितसर प्रेमात पडलो आणि एकमेकांची जोडीदार म्हणून निवड केली. त्यातच आम्ही दोघेही आता शिकवतो तेदेखील भवन्स महाविद्यालयात!
*  एकच क्षेत्र कसं वाटतं? – आम्हा दोघांचे क्षेत्र एकच असल्याचे खूप फायदे होतात. पण त्यातून गमतीही खूप होतात. निर्मलाने लग्नानंतर आपले आडनाव बदललेले नाही. त्यामुळे सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मनात थोडेसे प्रश्न निर्माण होत असावेत कदाचित. पण आम्ही त्यांची ही गोंधळलेली अवस्था चांगलीच एन्जॉय करतो. मजा बाजूला ठेवली, तरी आमच्याइतके एकत्र राहणारे जोडपे शोधून सापडणार नाही. आम्ही दोघेही सकाळी साडेपाचची गाडी पकडून विरारहून कॉलेजला येतो. दिवसभर लेक्चरचा वेळ सोडला, तर एकत्रच असतो. दोघांनाही सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड असल्याने तेथेही एकत्रच असतो. किंबहुना आम्ही एकत्र असतो, म्हणून आम्हाला अनेक गोष्टी करता येतात. बोलण्यासारखे अनेक विषय आमच्यात असतात. त्यामुळे दोघेही एकाच क्षेत्रात असल्याचा आम्हाला तरी त्रास होत नाही.
*  व्हॅलेण्टाइन डेचा प्लॅन – दरवर्षी व्हॅलेण्टाइन डेला सुट्टी मिळाली, तर आम्ही मुंबईबाहेर कुठेतरी शांत ठिकाणी जातो. यंदाही तसाच विचार आहे. पण सुट्टी मिळाली नाही, तरी संध्याकाळचा वेळ मस्त एकत्र घालवायचे ठरवले आहे. एखादा चांगला चित्रपट पाहून मग रात्री जेवण करूनच घरी येणार. सुट्टी मिळाली, तर मुंबईच्या बाहेर कुठेतरी जाणार आहोत.
संतोष-माधवी राजे (वकील)
* पहिली भेट – आम्हा दोघांचेही लग्न अरेंज मॅरेज प्रकारातले आहे. त्यामुळे पहिली भेट रोमहर्षक वगैरे अजिबातच नाही. पण साखरपुडा झाल्यानंतर लग्न होईपर्यंत आम्ही एकमेकांना भेटायचो, तो काळ अजिबात विसरता येणार नाही.
*  एकच क्षेत्र कसे वाटते? – नवरा-बायको एकाच क्षेत्रात, तेसुद्धा वकिलीसारख्या क्षेत्रात असतील, तर चढाओढ वगैरे असते, असे म्हणतात. पण आमच्या बाबतीत तसे काहीच झाले नाही. मुळात मला माझ्या वकिलीमध्ये मदत करणारी, एकमेकांना साथ देत व्यवसाय मोठा करणारी बायको हवी होती. माधवी अगदी तश्शीच आहे. एकाच क्षेत्रातली बायको मिळाल्याने मला कधी उशीर झाला, तरी ती समजून घेते. अशीलाला भेटणे, केसवर काम करणे, अशा अनेक गोष्टींमध्ये तिची खूप मदत होते. हा फायदा असला, तरी एक तोटा मात्र आहे. नवरा कुठे जातो, कोणाला भेटतो, हे सर्व तिला माहीत असते. त्यामुळे खोटे बोलून कुठे गेलोय, वगैरे गोष्टी खपतच नाहीत. विनोद बाजूला ठेवला, तरी दोघांचेही क्षेत्र एकच असल्याचा फायदा होतो.
*  व्हॅलेण्टाइन डेचा प्लॅन – आता आमच्या लग्नाला १४ वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे व्हॅलेण्टाइन डेचा विशेष प्लॅन वगैरे काही केलेला नाही. पण एक नक्कीच आहे. आमचा प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस असतो. आम्ही दोघे आयुष्यभर एकमेकांचे व्हॅलेण्टाइन आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Valentines exprience