लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय मंडळींना समाजातील सर्व घटकांचे सहकार्य घ्यावे लागत असल्याने त्याचा फायदा उठविण्यास अवैध व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे. दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरात जुगार, मटका, दारू अड्डे व्यावसायिकांचे प्रस्थ वाढण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकारांमुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काही वर्षांपासून वणी या तीर्थक्षेत्रास अवैध व्यावसायिकांनी गराडा घातला आहे. स्थानिक पोलिसांशी त्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याची उघड चर्चा असून, त्यामुळेच की काय येथील ठाण्यात बदलीसाठी कायम चुरस निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. चुकून एखादा इमानदार अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी येथे आल्यास त्याला फार काळ टिकू दिले जात नाही हा इतिहास आहे. मध्यंतरी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास किंवा अवैध व्यवसायांना आवर घालण्यास अपयश आल्यास स्थानिक पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते, परंतु वणी व परिसरात अशी कोणतीही कारवाई झाल्याचे आढळत नाही. त्यामुळे अवैध व्यवसाय बिनभोबाटपणे सुरू आहेत. काही कर्मचाऱ्यांनी तर येथे चार ते पाच वर्षांपासून ठाण मांडले आहे. तक्रारदाराचे आर्थिक वजन पाहूनच तक्रार स्वीकारायची किंवा नाही हे ठरविले जात असल्याचीही चर्चा आहे. सायंकाळी बहुतांश वेळा ठाणे अंमलदार अथवा कर्मचाऱ्यांसमवेत अवैध व्यावसायिक किंवा त्यांचे सहकारी दिसून येतात. अशा वेळी एखादी व्यक्ती तक्रार नोंदविण्यास गेली तर त्याचीच उलट तपासणी घेतली जात असल्याचा अनुभव काही जणांना आला आहे.
‘आर. आर. पाटलांच्या बांधाला बांध असलेल्या गावचे आम्ही असल्याने ते आमचे बांधभाऊ’ अशी शेखी मिरविणाऱ्या वणी येथील पोलीस अधिकाऱ्यांकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष का करतात याचे उत्तर वणीकरांना अद्यापही मिळालेले नाही. या संबंधित अधिकाऱ्याने सूत्रे हाती घेतल्यापासून दोन डझनपेक्षा अधिक चोऱ्या झाल्या. त्यापैकी किती चोऱ्यांचा तपास लागला, हा प्रश्नच आहे. मध्यंतरी कृष्णगाव येथे अमिन मन्सुरी प्रकरणात या अधिकाऱ्याने स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती, परंतु या प्रकरणाचा खोलवर तपास झालाच नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. गौण खनिज, कापसाच्या गाडय़ा अडविल्या जातात, परंतु अल्पावधीत त्या सोडल्या जातात. यामागील कारण काय?
३ फेब्रुवारी रोजी वणीच्या देशमुख गल्लीतील श्रावणी गणोरे (९) ही रात्री पावणेनऊच्या सुमारास घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अपहरणाचा प्रयत्न केला, परंतु श्रावणीने धैर्याने परिस्थितीशी तोंड दिल्याने दुचाकीस्वारांना पळ काढावा लागला.
महिन्यापूर्वी ओझरखेड धरणालगत पिस्तूलधारी युवकास तेथील व्यावसायिकांनी पकडून दिले होते. त्यात पोलिसांची कर्तबगारी कुठे? श्रावणीचा अपहरणाचा प्रयत्न झाल्यावर तिचे पालक जेव्हा रीतसर तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेले. तेव्हा कार्यरत हवालदार इतरांच्या दिमतीला असल्याचे उपस्थितांना दिसून आले. पालकांच्या तक्रारीनंतरही पोलीस दोन दिवस दखल घेत नसतील तर त्यास काय म्हणावे? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील पोलिसांच्या कार्यशैलीची वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात अवैध व्यवसायांची बजबजपुरी वाढू शकते.