शिक्षण पद्धतीच्या बदललेल्या स्वरूपामुळे बारावीनंतरच्या बी.ए.,बी.कॉम. व बी.एस्सी. या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे महत्त्व कमी झालेले असून नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना विविध कॉलेजमध्ये प्रवेशासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी विकास निधी व मॅनेजमेंट कोटय़ाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांचा निधी वसूल केला जात असल्याने विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र कॉलेजमधील सोयी-सुविधा पुरविण्यासाठीच या निधीचा उपयोग केला जात असल्याचे मत कॉलेजशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे देणारे आहेत, तर आम्ही का घेऊ नये असाही सवाल त्यांनी केला आहे. यामुळे गरीब तसेच बारावी नापास होऊन एक-दोन प्रयत्नानंतर यश मिळालेल्या, मात्र शिक्षण घेण्याची इच्छा असेल्या विद्यार्थ्यांना पैसे भरता येत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याची माहिती एका विद्यार्थ्यांने दिली आहे.
पदवी संपादन केल्यानंतरही त्याला जोड म्हणून आता मॅनेजमेंटसारखे इतरही अभ्यासक्रमपूर्ण करावे लागतात तेव्हाच कुठे तरी शिक्षणानंतर रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण होते. शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने जागा कमी आणि प्रवेश घेणारे अधिक त्यात पसंतीप्रमाणे हवा असणारा प्रवेश यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी हजारो रुपये मोजण्यास भाग पाडीत आहेत. यामध्ये आयटी पदवीधर होण्यासाठी तर लाखो रुपये मोजण्याची वेळ पालकांवर आलेली आहे. एकीकडे सार्वत्रिक शिक्षणाची सोय केली गेली असताना महाविद्यालयीन शिक्षणावरील खर्चात कपात करीत सरकारने विनाअनुदानाचे सूत्र स्वीकारल्याने विद्यार्थ्यांना हा भरुदड सोसावा लागत असल्याचे मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे.