जगातील सर्व आजारांचे मूळ शरीरातील मणक्यांच्या मुळाशी असून मणक्यांची रचना व्यवस्थित ठेवल्यास कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागणार नाही. आजकाल आपण योगी संस्कृतीला विसरत चाललो असून पाश्चात्यवादी भोगी संस्कृतीचे अनुकरण करत आहोत, अशी खंत आरोग्य अभ्यासक गोपाल यांनी व्यक्त केली.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित नाशिक वसंत व्याख्यानमालेत गोपाल यांनी ११ वे पुष्प ‘आरोग्य जनजागृती अभियान’ या विषयावर गुंफले. कधी काळी जगाला आरोग्याचे शिक्षण देणारा आपला भारत देश आज विविध आजारांमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या योगी संस्कृतीलाच आपण विसरलो आहोत. त्यमुळेच विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक घरात विविध व्याधींनी ग्रस्त लोक आपल्याला दिसून येतात. या आजारांच्या मुळाशी गेल्यास त्यावर ‘सेराजेम थेरेपी’ हा उपचार असल्याचा दावा गोपाल यांनी केला.
आरोग्याची कल्पना केवळ आजारापुरता मर्यादित राहिली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याचे संतुलन राखणे हे सर्वात आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पोषक आहार, व्यायाम आणि योगा या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. आरोग्य हेच जीवन असून आजाराला नेहमी दूर ठेवले पाहिजे. संपूर्ण शरीराला आधार देणाऱ्या मणक्यांच्या परवानगीशिवाय मेंदूला सूचना देणे अवघड होते. त्या मणक्यांशी जोडलेल्या नसांमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा बिघडते. सेराजेम थेरेपीमध्ये आजारांच्या मुळाशी जात संबधिंत मणक्याच्या नसांवर दाब दिला जातो. त्यामुळे कामकाज न करणारी यंत्रणा पुन्हा कामाला लागते याचा अनुभव अनेकांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
सेराजेम थेरेपी विषयी त्यांनी यावेळी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीकांत बेणी यांनी केले. तर, प्रा. कृष्णा शहाणे यांनी आभार मानले.