उन्हाची तीव्रता आणि पाण्याच्या टंचाईमुळे भाज्याच्या किमतीमध्ये दीडपट वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाज्यांचे भाव स्थिर असताना काही ठिकाणी उन्हाचा तडाखा, पाण्याचा अभाव आणि काही ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे भाज्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे चिल्लर बाजापेठेत भाज्याचे भाव २५ ते ५० रुपये किलोप्रमाणे वाढले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत दीड पटीने भाव वाढले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागात मुबलक पाणी मिळत नाही. बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव वाढले आहे. उन्हाच्या तीव्रतेने पालेभाज्या अक्षरश: कोमेजून जात आहेत. कॉटन मार्केटमधील राजाभाऊ पत्राळे यांनी सांगितले, गेल्या आठ दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्याने गेल्या महिन्यापेक्षा सर्वच भाज्यांचे भाव दीड पटीने वाढले आहे. यावेळी ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. विहिरींना पाणी नाही. त्यामुळे  प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढले आहे. भाववाढीमुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा असला तरी सामान्य नागरिकांना मात्र याचा फटका बसतो आहे.
गेल्या महिन्यात टोमॅटो २५ रुपये किलो, वांगी १५ रुपये व फूल कोबी ३० रुपये किलो असे दर होते. दोडके, भोपळा, कोथिंबीर, बटाटे, कांदे, पालक यांचेही भाव असेच परवडणारे होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. एका कुटुंबासाठी किमान प्रत्येक एक किलो प्रमाणे दोन ते तीन भाज्या घेतल्या तरी १०० ते १५० रुपये खर्च करावे लागतात. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे त्याचा परिणाम भाज्यासह अन्य उत्पादनावर झाला आहे. वांगी, दोडका, पत्ताकोबी, पालक, भेंडी, कारले या भाज्यांचे भाव २० ते २५ रुपये किलो दरावरून थेट ४० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. अद्रक-लसणाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा असाच राहिला तर जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत भाजीपाल्याचे भाव असेच राहतील किंवा आणखी वाढतील, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
वाढता वाढता वाढे..
आले१२० रुपये किलो, वांगी २५, चवळीच्या शेंगा ३०, गवार ३०, सुरई ३०, कारले ३०, फुलकोबी ५०, पत्ताकोबी ४०, टोमॅटो ४५, भेंडी ३०, सांबार ८०, चवळी ३०, ढेमस ३५, काकडी ३०, कोहळं २५, लसूण ९० रुपये, मिरची ६०, तोंडले ३० रुपये, सिमला मिरची ४० रुपये