औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटना व व्हेरॉक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे आयोजित सातव्या आंतरशालेय व्हेरॉक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या हस्ते झाले.
जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, नरेंद्र पाटील व व्हेरॉकचे उपाध्यक्ष एम. पी. शर्मा आदी उपस्थित होते. सरस्वती भुवन शाळेच्या एनसीसी व वाद्यवृंद पथकाने मानवंदना दिली. जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सहभागी संघातील मुलांनी आपल्या संघास विजयी करतानाच जिल्हा व राज्यस्तरीय पातळीवर निवड कशी होईल, हे उत्कृष्ट खेळातून सिद्ध करावे, असे आवाहन केले. नरेंद्र पाटील यांनी शहरातून एखादा सचिन तेंडुलकर तयार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. एम. पी. शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासह खेळातही लक्ष घालावे, असे सांगितले.
पहिल्या सामन्यात केंब्रिज स्कूलने पोदार इंटरनॅशनल स्कूलचा ६७ धावांनी पराभव केला. १५ षटकांच्या या सामन्यात केंब्रिजने १५०, तर पोदारने ८७ धावा केल्या. केंब्रिजच्या अर्पित देशपांडेने ४७ धावा फटकावल्या. रविराज गजमल (७७ धावा) सामनावीर ठरला. होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल व औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल या दोन संघांमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात होली क्रॉसने ४ गडी राखून विजय मिळविला. होली क्रॉसचा अर्जुन राजपूत सामनावीर ठरला.