तिकीट वाटपातील गोंधळ, कार्यकर्ते पाठीशी नसलेल्यांच्या हाती पक्षाची सूत्रे, एकमेकांना सदैव पाण्यात बघण्याची व पाय खेचण्याची प्रवृत्ती, गटागटात विखुरलेले नेते-कार्यकर्ते, तसेच व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, याचा विसर पडल्याने या जिल्ह्य़ात कॉंग्रेसचा अतिशय मानहानीजनक पराभव झाला. पक्षाची सध्याची स्थिती बघता कॉंग्रेस विसर्जनाची महात्मा गांधींची इच्छा ही नेते पूर्ण करतील, अशीच परिस्थिती येथे आहे.
कधी काळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा आज भाजपचा मजबूत गड बनलेला आहे. प्रथम लोकसभा व आता विधानसभेच्या सहापैकी चार जागा जिंकून भाजपने काँग्रेसला चारीमुंडय़ा चित केल्याने त्या पक्षाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कॉंग्रेसचे स्थानिक नेतेच कारणीभूत आहेत. पूर्वी कॉंग्रेसमध्ये वामनराव गड्डमवार व नरेश पुगलिया हे दोन नेते सक्रीय होते. गड्डमवारांचे अकाली निधन, पोटदुखेंची सक्रीय राजकारणातून निवृत्ती आणि पुगलियांच्या सततच्या पराभवाने येथे कॉंग्रेस कमकुवत झाली. पुगलिया गट आजही राजकारणात सक्रीय आहे. मात्र, त्यांना लोकमान्यता नाही. स्पष्टवक्तेपणा हा दोष सोडला तर पुगलियांमध्ये नेतृत्व गुण आहेत. दूरदृष्टी, विकास कामांसाठी लागणारा निधी, मोठे प्रकल्प आणण्याची क्षमता आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना बाजूला ठेवून नेतृत्वाची कुवत नसलेल्या आणि सदैव एकमेकांना लाथा मारण्यात धन्यता मानणाऱ्या विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे व संजय देवतळे या त्रयींच्या हाती पक्षाची सूत्रे गेली. परिणामत: लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. लोकसभेत झालेली गत विधानसभेत होऊ नये म्हणून स्थानिक, केंद्रीय व राज्यातील नेतृत्वाने काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज होती. मात्र, तिकीट वाटपापासून सुरू झालेला गोंधळ मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता. त्याचा परिणाम जिल्ह्य़ात कॉंग्रेसचा प्रचारच उभा राहू शकला नाही.
बल्लारपूर वगळता घनश्याम मूलचंदानी यांना ओळख नसल्याने मुनगंटीवार यांना विजय सोपा झाला. त्यातही मूलचंदानींचे मताधिक्य ५५ हजारांपुढे जाऊ नये म्हणून कॉंग्रेसचेच कार्यकर्ते परिश्रम घेतांना दिसत होते. राजुऱ्यात सुभाष धोटेंना अतिआत्मविश्वास नडला. त्यातच माजी आमदार प्रभाकर मामुलकर अगदी सुरुवातीपासूनच धोटे यांच्यावर नाराज होते. मामुलकरांना राजुराची जागा भाच्यासाठी हवी असल्याने ते शरीराने धोटेंसोबत असले तरी मनाने नव्हते, तसेच धोटे नको असल्याने पुगलिया गटाने राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर यांना बळ दिले. त्याचा नेमका फटका धोटे यांना बसला. वरोरा विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या पराभवाला तिकीट वाटपातील गोंधळ कारणीभूत ठरला. तेथे पालकमंत्री संजय देवतळे यांना तिकीट दिले असते तर कदाचित चित्र वेगळे असते. पक्षश्रेष्ठींनी तिकीट नाकारल्यानंतर देवतळेंनी जन्मभराच्या निष्ठेवर तुळशीपत्र ठेवून भाजपची साथ केली. आता देवतळेंचा अवघ्या काही मतांनी पराभव झाल्यानंतर भाजप नेते एक विरोधक कमी झाल्याच्या आनंदात आहेत. देवतळे कुटुंबातील महाभारतसुध्दा या पराभवास तेवढेच कारणीभूत ठरले आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसने माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर यांना उमेदवारी दिली. परिणामत: येथे कॉंग्रेसचा पराभव झाला. प्रत्यक्षात डॉ.वारजूकर यांना उमेदवारी देण्यामागे विजय वडेट्टीवार यांची चाणाक्ष बुध्दी कारणीभूत आहे. ब्रम्हपुरी वगळता पाचपैकी सहा जागा गमावल्याने या जिल्ह्य़ात कांॅग्रेसची सुत्रे वडेट्टीवार यांच्या हाती जातील, यात काही शंका नाही. कॉंग्रेस नेत्यांच्या पाडापाडीच्या राजकारणामुळेच कॉंग्रेसची जिल्ह्य़ात ही अवस्था झाली आहे. या पराभवाचे विश्लेषण करीत गटबाजी विसरून कॉंग्रेसचे सर्व नेते एकत्र आले तरच हा पक्ष येथे जिवंत राहू शकतो.