अमरावती जिल्ह्य़ातील आठपैकी चार मतदारसंघांमध्ये कमळ फुलवण्याची अपूर्वाई भाजपला मिळाली असताना शिवसेनेला एकही जागा हाती येऊ न देणे हा अविष्कार मतदारांनी दाखवून दिला आहे. सेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी हा इशारा ठरला आहे. काँग्रेसची पडझड झाली असली, तरी दोन जागा राखल्या गेल्याचे समाधान काँग्रेस नेत्यांना आहे. राष्ट्रवादीसाठीही ही निवडणूक लाभदायक ठरली नाही. एका ठिकाणी राष्ट्रवादी समर्थित उमेदवाराला विजयाची संधी मिळू शकली.
काही ठिकाणी थेट तर अनेक ठिकाणी बहुरंगी लढती झाल्या. अमरावतीत ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून, माजी राष्ट्रपतीपुत्र व काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांच्या विरोधात डॉ. सुनील देशमुख यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले. कामांची जाहिरातबाजी करूनही शेखावत यांना यावेळी जातीय समीकरणांनी साथ दिली नाही. बडनेरात अपेक्षेप्रमाणे चुरशीची निवडणूक झाली. राष्ट्रवादी समर्थित अपक्ष उमेदवार रवी राणा यांना पुन्हा निवडून येण्याची संधी मिळाली असताना मात्र शिवसेनेचे संजय बंड, काँग्रेसच्या सुलभा खोडके, भाजपचे तुषार भारतीय यांनी कडवी झुंज दिली आहे. मोर्शीत भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. शिवसेना-विदर्भ जनसंग्राम-भाजप, असा त्यांचा प्रवास झाला. कोणत्याही आमदाराला सलग दुसऱ्यांदा निवडून न देण्याची परंपरा यावेळी मोडीत निघाली. तिवसामधून तिरंगी लढतीत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली. विकास कामांचा प्रचार त्यांच्या कामी आला आणि खुद्द लहान बहीण विरोधात उभी असतानाही त्यांनी सहजपणे गड जिंकला. भाजप आणि शिवेसेनेची मतविभागणी त्यांच्या पथ्यावर पडली.
दर्यापूरमध्ये शिवसेनेचे अभिजीत अडसूळ यांना मतदारांनी नाकारत खासदार आनंदराव अडसूळ यांना मतदारांनी वेगळेच संकेत दिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दर्यापूरमधून अडसूळ यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. जातीय संरचनेची आणि मतविभागणीची गणिते या ठिकाणी प्रबळ ठरतात. भाजपचे रमेश बुंदिले यांचा विजय हा भाजपचे नेते प्रकाश भारसाकळे यांच्या गटाचा विजय मानला जात आहे. मेळघाटात भाजपच्या प्रभुदास भिलावेकर यांना निवडून देत मतदारांनी पक्षबदलाची परंपरा जोपासणाऱ्या राजकुमार पटेल यांना योग्य संदेश दिला. त्याचवेळी काँग्रेसचे आमदार केवलराम काळे यांना तिसऱ्या स्थानी पाठवले.
अचलपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. त्यांच्यासमोर यावेळी भाजपच्या नवख्या उमेदवाराने आव्हान उभे केले होते, पण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी बांधणी केलेली प्रहारची संघटनशक्ती त्यांच्या कामी आली. निवडणुकीच्या वेळी संधीसाधूपणा करणाऱ्या सुरेखा ठाकरे आणि वसुधा देशमुख यांना मतदारांनी सूचक इशारा दिला आहे. धामणगाव रेल्वेतील लढत अपेक्षेप्रमाणे काटय़ाची झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा चांदूर रेल्वे येथे झाल्यानंतर ‘अरुणोदया’च्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपच्या अरुण अडसड यांना सायंकाळपर्यंत पराभव पहावा लागला. विकास कामांचा प्रचार करत वीरेंद्र जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. बसपचे अभिजीत ढेपे यांनीही चांगली झुंज दिली. शिवसेना, मनसे  आणि इतर पक्षांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.