चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांना प्रचंड मताधिक्य मिळाले होते. काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत हे मताधिक्य कायम राखण्यास काही उमेदवारांना यश आले तर काहींना त्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. याचाच दुसरा अर्थ निवडणुकीप्रमाणेच समीकरणही बदलले असल्याचे अधोरेखित होत आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना १ लाख ७५ हजार ७९१ मताधिक्य मिळाले होते. त्यात कामठी मतदारसंघातून ३५ हजार ४२३, काटोलमध्ये ३८ हजार ४४६, सावनेरमध्ये २९ हजार ९३९, रामटेकमध्ये २६ हजार ०८६, हिंगणामध्ये १६ हजार ९८३ आणि उमरेडमध्ये ३१ हजार ४५१ मतांचा समावेश होता. लोकसभेच्यावेळी नरेंद्र मोदी यांची लाट होती. विधानसभा निवडणुकीतही हीच स्थिती राहून रामटेक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सहाही उमेदवार निवडून येतील, असा वरिष्ठांचा अंदाज होता, परंतु तो शंभर टक्के यशस्वी झाला नाही. कारण या सहापैकी तीन मतदारसंघातच हे मताधिक्य कायम राखण्यात यश आले. दोन मतदारसंघात त्यात घट झाली, तर एका मतदारसंघात तर सेनेच्या उमेदवारालाच पराभव बघावा लागला.
कामठी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हे मताधिक्य कायमच नव्हे तर त्यात वाढ करण्याचाही विक्रम केला. त्यांना १ लाख २६ हजार ७५५ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांना ८६ हजार ७५३ मते मिळाली. बावनकुळे यांचा ४० हजार ००२ मतांनी विजय झाला. कृपाल तुमाने यांना ३५ हजार ४२३ मताधिक्य मिळाले होते. बावनकुळे यांनी मात्र त्यात आणखी साडेचार हजार मतांची भर घातल्याचे दिसून येते. मताधिक्यात वाढ करण्यामध्ये बावनकुळे यांच्यानंतर सुधीर पारवे यांचा क्रमांक लागतो. त्यांना ९२ हजार ३९१ मते मिळाली. तर त्याचे प्रतिस्पर्धी बसपचे रुक्षदास बन्सोड यांना ३४ हजार ०७७ मते प्राप्त झाली. पारवे ५८ हजार ३२२ मताधिक्य घेऊन विजयी झाले. कृपाल तुमाने यांना लोकसभा निवडणुकीत ३१ हजार ४५१ मताधिक्य मिळाले होते. पारवे यांनी हे मताधिक्य कायम ठेवत त्यात आणखी २७ हजार मतांची भर घालून हा मतदारसंघ आणखी मजबूत करून ठेवल्याचे दिसून येते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पारवे ४४ हजार ६९६ मतांनी विजयी झाले होते.
हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे यांना ८४ हजार १३९, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे रमेश बंग यांना ६० हजार ९८१ मते मिळाली. २३ हजार १५८ मतांनी मेघे विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत तुमाने यांना या मतदारसंघातून १६ हजार ९८३ एवढे मताधिक्य मिळाले होते. मेघे यांनी हे मताधिक्य कायम ठेवून त्यात आणखी सात हजार मतांची भर धातली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बंग यांना ६४ हजार ३३९ मते मिळाली होती. काल झालेल्या निवडणुकीत बंग यांना ६० हजार ९८१ मते मिळाली. याचाच अर्थ असा की बंग यांच्या मताधिक्यात घट झाल्याचे स्पष्ट होते. काटोलमध्ये भाजपचे आशिष देशमुख यांचा ५ हजार ५५७ मतांनी विजय झाला. याच मतदारसंघातून तुमाने यांना ३८ हजार ४४६ मताधिक्य मिळाले होते. सेनेचे राजेंद्र हरणे यांना १३ हजार ६४९, शेकापचे राहुल देशमुख यांना ९ हजार ५८९ मते मिळाली. आशिष देशमुख यांना मिळालेले मताधिक्य तसेच हरणे व राहुल देशमुख यांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तरी ती तुमाने यांना मिळालेल्या मताधिक्यांपर्यंत जाऊन पोहचत नाही. यावरून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी भाजप-सेनेचे मताधिक्य कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
रामटेक मतदारसंघातून भाजपचे डी. मल्लीकार्जून रेड्डी १२ हजार ०८१ मतांनी विजयी झाले. रेड्डी यांना ५९ हजार ३४३, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सेनेचे आशिष जयस्वाल यांना ४७ हजार २६३ मते मिळाली. कृपाल तुमाने यांनी २६ हजार ०८६ मताधिक्य घेतले होते. त्यामानाने रेड्डी यांना मिळालेले मताधिक्य फारच कमी आहे. सावनेर मतदारसंघातून सेनेचे कृपाल तुमाने यांना २९ हजार ९३९ मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भाजप-सेनेला काटोलनंतर हाच मतदारसंघ अत्यंत भरवशाचा वाटत होता. परंतु येथे चित्र उलटेच झाले.
या मतदारसंघातील मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीत तुमाने यांच्या पारडय़ात भरभरून मते टाकली असतानाच विधानसभा निवडणुकीत मात्र सेनेच्या उमेदवाराला नाकारले. येथे भाजपचा उमेदवार रिंगणात नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.