जिल्ह्य़ात एकमेव दुहेरी लढत असणाऱ्या आर्वीत, तसेच जातीय समीकरण झपाटय़ाने बदलल्याने हिंगणघाट मतदारसंघात विद्यमान आमदारांपुढे कडवे आव्हान उभे झाल्याचे चित्र आहे.
आर्वीत भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्यापुढे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांची मुख्य लढत असून राकाँचे संदीप काळे यांचा तिसरा पैलू आहे. रिंगणात अगदी वेळेवरील उमेदवारी म्हणून संदीप काळे यांच्या उमेदवारीकडे पाहिले जाते, पण सहकार गटाचे वारसदार म्हणून व शोभेशी मते मिळावी म्हणून राकाँचा उमेदवार लढतीत आहे. विद्यमान आमदार दादाराव केचे यांची सहज जनसंपर्क ही सर्वात उजवी बाजू समजली जाते. सोबतच मोदी वलयाचा प्रभाव जमेला आहे, पण ज्या मोदी लाटेचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत सर्वत्र दिसला त्यावेळी याच आर्वी मतदारसंघात भाजपच्या खासदारास सर्वात कमी मताधिक्य मिळाले होते. ही केचेंसाठी धोक्याची घंटा ठरली होती.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केचेंनी स्वत:च्या गटास अध्यक्षपद लाभावे म्हणून केलेला रात्रकालीन दबाबाचा पैलू पक्षांतर्गत शत्रू निर्माण करणारा ठरला. थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत ही बाब पोहोचली. तिसरी स्थानीय बाब म्हणजे, पाच वर्षांच्या कालावधीत केचेंनी आमदार निधीतील कामांसाठी बाहेरच्या कंत्राटदारांना प्राधान्य दिले होते. त्याची सल स्थानिक कंत्राटदारांनी ठेवून विरोधात प्रचाराचे रान उठविले आहे, पण असे असले तरी केचेंना मोदी प्रभाव जनसंपर्क व बोलका स्वभाव या विजयासाठी जमेच्या बाजू वाटतात, तर आमदार असतांना केलेल्या चुका गत पाच वर्षांत पूर्णपणे दूर करून अमर काळे यांनी स्वत:ची बाजू बरीच सावरली आहे.
 काँग्रेसविरोधी मतांचे यावेळी सेना उमेदवाराच्या उपस्थितीमुळे होणारे विभाजन त्यांना विजयाचा आधार वाटतो.  हिंगणघाटला शिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक शिंदे यांना भाजपच्या समीर कुणावार यांनी जेरीस आणल्याचे चित्र आहे. राकाँचे माजी आमदार राजू तिमांडे यांचीही रिंगणात दमदार हजेरी आहे. पूरग्रस्त, कामगार यादवी, दुष्काळ, अशा क ोणत्याही प्रश्नावर मौन बाळगणाऱ्या शिंदेंना दरवेळी जातीचा आधार तारून नेणारा ठरल्याचा इतिहास आहे, पण यावेळी कांॅग्रेसच्या उषाकिरण थुटे व अपक्ष किसना व्यापारी यांनी या मतांना सुरूंग लावणे सुरू केले आहे. सेनेचा जिल्ह्य़ातील बालेकिल्ला राहिलेल्या हिंगणघाटमध्ये मनसेनेही बाळसे धरले आहे. खुद्द राज ठाकरेंनी जाहीर सभा घेऊन सेनेवर तोफ  डागल्याने शिंदेंना गादी टिकविण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. सेनेच्या गडाला भाजप व राकाँ उमेदवार धडका देत असून या तिरंगी लढतीत चित्र अस्पष्ट होत आहे. सर्व आघाडय़ांवर भक्कम असणाऱ्या या तीनही उमेदवारांच्या प्रचारतंत्राने मतदारांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे.