शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार करणाऱ्या आणि रक्ताने बरबटलेल्या सरकारला भेटायला आलो नाही तर इशारा देण्यासाठी आलो आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना सरकारने न्याय दिला नाही तर विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये मंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी विधानभवनावर स्वाभिमानी संघटनेचा मोर्चा धडकल्यानंतर राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्यभरातील शेतकरी-शेतमजूर मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी म्हणाले, राज्यातील शेतकरी दुष्काळ व नापिकीचा सामना करीत आहे. त्यावर मात करून शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, धान, तूर, मका इत्यादी पिकांचे उत्पादन केले. त्यासाठी प्रचंड खर्च केला मात्र शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतक ऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. कधी मोठय़ा प्रमाणात आयात करून तर कधी निर्यात बंदी करून सरकार शेतीमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा भरुन निघत नाही. विक्रमी उत्पादन घेऊनसुद्धा शेतकरी आज कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर धान, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात आत्महत्या केल्या आहे. त्यावर उपाय योजना म्हणून मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी पॅकेज घोषित केले. त्यानंतर ७१ हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करूनही शेतक ऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढा भाव मिळेपर्यंत शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबणार नाहीत, असेही शेट्टी म्हणाले.  
विदर्भ मराठवाडय़ातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी झालेला खर्च व्यर्थ गेला. राज्य सरकार श्वेतपत्रिका जाहीर केली मात्र सिंचनाची खरी परिस्थिती नसून केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्य सरकार आज सारवासारव करीत असले विदर्भ आणि मराठवाडय़ातील सिंचनाचे वास्तव चिंताजनक आहे. सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन किंवा एसआयटीच्या माध्यमातून चौकशी  व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार शेट्टी यांनी केली. शेती मालाच्या आणि सिंचनाच्या बाबतीत सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. हा असंतोषाचा उद्रेक आंदोलन रुपाने व्यक्त होऊ नये असे वाटत असेल तर सरकारने तातडीने उपाययोजना करावी असा इशारा शेट्टी यांनी दिला. यावेळी सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर, गजानन अमदाबादकर, सिताराम भुते, अ‍ॅड विनायक काकडे उपस्थित होते.