माहिती मिळत नसल्याने नागरिकांना मन:स्ताप

अमरावती : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र लसीचा तुटवडा असल्याने जिल्ह्य़ातील बहुतांश केंद्रांवर लसीकरण बंद आहे. मात्र याबाबत नागरिकांना माहिती मिळत नसल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्राबाहेर पहाटेपासूनच रांगा लावल्याचे चित्र दिसले.

जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात करोनाबाधितांचा आलेख मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. करोनापासून संरक्षणासाठी नागरिकांनी लस घ्यावी याबाबत शासनाकडून जनजागृती केली जात आहे. तसेच १ मे पासून १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी देखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्य़ात त्यासाठी के वळ पाच केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दुसरीकडे शहर आणि जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी नागरिकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. लसीचा तुटवडा लक्षात घेता अनेक लसीकरण केंद्रे बंदच ठेवण्यात आली. मात्र माहितीअभावी नागरिकांनी लस घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होता.

लसीचा साठा लवकर संपत असल्यामुळे बहुतेकांना रांगेत उभे राहिल्यानंतरही लस न घेताच परत यावे लागत आहे. सध्या जिल्ह्य़ाचा आरोग्य विभाग शासनाकडून लस केव्हा उपलब्ध होणार याचीच प्रतीक्षा करीत आहे. लसींच्या सततच्या तुटवडय़ामुळे नागरिक त्रस्त झाले असून अपुऱ्या पुरवठय़ामुळे लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. १८ ते ४४ या वयोगटासाठी १ मेपासून लसीकरणाला सुरुवात झाली. दिवसाला पाच केंद्रांवर प्रत्येकी २०० नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून तेही दोन दिवसांत पूर्ण झाले नाही. त्यामुळे या वयोगटासाठी राखीव ७ हजार ५०० लसींपैकी १८ ते ४४ या वयोगटातील १ हजार २०० नागरिकांचेच दोन दिवसांत लसीकरण होऊ शकले. जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यातच साडेचार कोटी लसींची मागणी केली होती. परंतु आता मे महिना सुरू झाला तरी तेवढा साठा अद्याप जिल्ह्यला मिळाला नाही. दरम्यानच्या काळात शासनाने ४५ वर्षांवरील कोणत्याही नागरिकाला लस दिली जाईल, अशी घोषणा केल्याने सर्व केंद्रांवरील गर्दी वाढली. परिणामी, अनेक केंद्रांचे नियोजन कोलमडले. मध्यंतरी अनेक दिवस लसीकरण केंद्र पूर्णत: बंद झाले होते.

दुसरीकडे, ज्या नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे, त्यांना ठराविक कालावधीनंतर दुसरी मात्रा घेणे आवश्यक असताना लसींच्या तुटवडय़ामुळे हेही नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. अनेक नागरिकांमध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे.

वयोमर्यादा २५ वर्षे करावी

देशात १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाल्यानंतर लसीकरणाच्या प्रक्रियेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. लसींसह लसीकरण केंद्रांची संख्या कमी पडत आहे. अद्यापही दुसऱ्या टप्प्यातील अनेक नागरिकांना लस मिळू शकलेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी लसीकरणाची वयोमर्यादा १८ ऐवजी २५ वर्षे वयाची असावी तसेच ७० टक्के लसीकरण हे खासगी केंद्रांच्या माध्यमातून करण्यात यावे.

– डॉ. अविनाश चौधरी, नेफ्रॉलॉजिस्ट, अमरावती.