पांडवांना शोधत वणवण भटकणारा हस्तिनापूरचा राजा सुयोधन (ज्याला आपण दुर्योधन नावाने ओळखतो) मलनाडच्या त्या परिसरात पोहोचला तेव्हा तिथल्या लोकांचे आदरातिथ्य पाहून भारावून गेला. ते लोक कुरावा नावाच्या खालच्या जातीचे आहेत हे त्याला कळले होते पण, त्यांच्या सद्विचारांनी आणि सद्वर्तनाने खूष झालेल्या सुयोधनाला त्यांच्या जातीशी काही देणेघेणे नव्हते. त्याने तिथेच बसून शिवाची आराधना केली आणि त्या लोकांना सदासुखी ठेवण्याचे आवाहन केले. शिवाय, १०० एकर जमीन त्यांना कसण्यासाठी दिली. तेव्हापासून मलनाडमध्ये दुर्योधन नावाच्या देवाचे मंदिर उभे आहे. आजघडीला ३ लाखांहून अधिक भक्त तिथे ज्याची देव म्हणून आराधना करतात त्याच्यात कुठलाच चांगला गुण नसेल?, या एका विचाराने जन्म दिला तो ‘अजया’ कादंबरीला..
गेल्यावर्षी बेस्टसेलर ठरलेल्या ‘असुरा – टेल ऑफ व्हॅन्क्विश्ड’ या कादंबरीचे लेखक आनंद नीलकंठन यांच्या ‘अजया’ या दुसऱ्या कादंबरीच्या पहिल्या लाख प्रती बाजारात धडकल्या आहेत. अर्थात, हे यशच दुर्योधनाच्या आजवर आपण ऐकलेल्या महाभारतात दडलेल्या खऱ्या चेहऱ्याचे सुयोधनाचे आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे आनंद नीलकंठन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. त्या काळी जातपात न मानणारा, कर्णासारख्या तथाकथित खालच्या जातीतील वीराला मित्रत्त्वाने वागवणारा, आपल्या हक्कासाठी लढणारा आणि मी जर माझ्या प्रजेला चांगले वागवतो आहे, ते आनंदी आहेत. एक प्रशासक म्हणून मी उत्कृष्ट कामगिरी बजावली असताना कोणत्या आधारावर तू मला हस्तिनापूरचे राज्य सोडायला सांगतोस, असा कृष्णाला थेट जाब विचारणारा दुर्योधन धैर्यवान आहे. त्याचे विचार हे काळाच्या पुढे आहेत तेच या कादंबरीत मांडले आहे, असे निलकंठन यांनी सांगितले.
केरळातील कोचीनच्या खेडय़ातून अतिशय धार्मिक वातावरणात लहानाचे मोठे झालेल्या नीलकंठन यांनी पहिली कादंबरी लिहीली तीही रावणाचे वेगळेपण सांगणारी. पुराणातील कथा ऐकत, त्यांच्यावरच्या बौध्दिक चर्चा ऐकतच मोठे झालो, त्यामुळे रामायण, महाभारत ही महाकाव्ये आणि त्यात दडलेल्या व्यक्तिरेखांचा अभ्यास हा विषय आपल्याला नविन नाही, असे ते म्हणाले. दुर्योधनाचे असे अनेक संदर्भ, त्याच्याबद्दलच्या कथा वाचायला, ऐकायला मिळतात. पहिली कादंबरी लिहित असतानाच अनेक संदर्भ आपल्याकडे जमा झाले होते. पण, मलनादा मंदिरात दुर्योधनाला देव म्हणून मानणारी अनेक लोक पाहिल्यानंतर त्याचे वेगळेपण कादंबरीच्या माध्यमातून लिहिण्याचा विचार निश्चित झाला, असे त्यांनी सांगितले. ‘अजया’च्या एक लाख प्रती प्रकाशकांना बाजारात आणाव्या लागल्या त्यामुळे त्याला यश किती मिळणाऱ? हा प्रश्नच उरलेला नाही असेही त्यांनी सांगितले.
कौरव म्हणजे दुष्ट आणि पांडव म्हणजे सज्जन ही विभागणी जनमानसामध्ये अगदी पक्की आहे. मात्र मराठीमध्ये स्व. शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’नंतर कर्णाबद्दल संपूर्ण समाजाचे जणू मतपरिवर्तन झाले. मृत्युंजयनंतर कर्णाची ‘दुष्टांच्या संगतीतील सज्जन’ अशी प्रतिमा निर्माण झाली. असाच दुर्योधनाता ‘प्रतिमाबदल’ या पुस्तकामुळे होईल का हे आता बघायचे!