माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त विविध जिल्ह्य़ांच्या ठिकाणी उद्या (बुधवारी) व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
विलासराव देशमुख सेंटर या सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थेतर्फे व्याख्यानांचे आयोजन केले आहे. सेंटरचे अध्यक्ष उल्हास पवार, अॅड. त्र्यंबकदास झंवर, पी. एन. पाटील, सुधाकर गणगणे, मुजफ्फर हुसेन व डॉ. सुधीर तांबे यांनी या साठी परिश्रम घेतले. विलासरावांच्या स्वप्नातील विकास, त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने या व्याख्यानांचे आयोजन आहे.
औरंगाबादला सिडको येथील संत तुकाराम नाटय़गृहात सायंकाळी ५ वाजता डॉ. नरेंद्र जाधव यांचे अन्नसुरक्षा कायदा यावर व्याख्यान होईल. लातूर येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुरेश द्वादशीवार यांचे ‘विलासराव देशमुख बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ या विषयावर व्याख्यान होईल. दयानंद सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल. जालना शहरात हॉटेल गॅलक्सी डीलक्स येथे सायंकाळी ५ वाजता विश्वनाथ माळी यांचे ‘वृत्तपत्र क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होईल. परभणीला बी. रघुनाथ सभागृहात सायंकाळी ५ वाजता प्रशांत जोशी यांचे ‘आधुनिक माध्यमांचा वाढता प्रवास’ या विषयावर व्याख्यान होईल. िहगोलीच्या केमिस्ट भवन सभागृहात सायंकाळी ५ वाजता राजीव जगताप यांचे दृष्टिक्षेपात उच्च व तंत्रज्ञ या विषयावर व्याख्यान होईल. अंबाजोगाई येथे मुकुंदराज सभागृहात सायंकाळी ७ वाजता डॉ. अविनाश इनामदार यांचे आरोग्य, वास्तव व अपेक्षा या विषयावर व्याख्यान होईल. उस्मानाबादच्या परिमल हॉलमध्ये दुपारी २ वाजता ‘जीवनातील कलेचे महत्त्व’ या विषयावर अरुण नाईक यांचे व्याख्यान होईल. मराठवाडय़ाबाहेरील जवळपास सर्व जिल्हय़ांत या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
बाभळगावला प्रार्थनासभा
बाभळगाव येथे सकाळी ८ ते ९ दरम्यान प्रा. वृषाली कोरडे देशमुख व शशिकांत देशमुख यांचा प्रार्थना, भजनाचा कार्यक्रम होणार आहे. याचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे करणार आहेत. विलासरावांनी राजकारणाला लोकसेवेचे माध्यम मानले होते. आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच मागासलेला भाग, विकासापासून कोसो दूर राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नात बारकाईने लक्ष घातले. या आठवणींना उजाळा, तसेच आदरांजली वाहण्यात येणार आहे. समाधिस्थळी देशमुख कुटुंबीय, विविध मान्यवर, जनतेच्या वतीने पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात येईल.