महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांसह लक्षावधी भाविक – वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा हा चांदीने मढवण्यात येणार, तर संत नामदेव पायरीच्या पायऱ्याही चांदीने मढवल्या जाणार आहे. स्थानिक नागरिक व दानशूर या करता पुढे येत आहेत, अशी माहिती कार्यकारी अधिकारी बेलदार यांनी दिली.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून त्यांनी सदस्यांना विश्वासात घेऊन अनेक उत्तम निर्णय घेतले आहेत. याचाच भाग म्हणून विठ्ठल व रुक्मिणीचा गाभारा चांदीने मढवून झळाळी देण्याचा प्रयत्न चालू आहे. विठ्ठलाचा गाभारा मढवण्यास २०० किलो चांदी लागणार आहे. ती एका दानशूर व्यक्तीने देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
महाद्वारातून विठ्ठल मंदिराकडे जाताना संत नामदेवांनी आपल्या भावंडासह सुमारे चौदा जणांनी समाधी घेतली, कारण विठ्ठल दर्शन घेण्यास जाणाऱ्या भक्ताची पायधूळ या पायरीस लागावी, ती नामदेव पायरी. यास श्रद्धेपोटी कोणीच पाय लागू देत नाही. अशा या नामदेव पायरीसह आत जाण्यास ११ पायऱ्या आहेत. या पायऱ्या चांदीने मढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास सुमारे २०० ते ३०० किलो चांदी लागणार आहे.
आषाढी, कार्तिकी तसेच महिन्याची व पंधरा दिवसाची एकादशीला मोठय़ा प्रमाणात वारकरी भाविक येतात. त्यांनी जर चांदी दान म्हणून समितीला दिली तर समितीकडे कितीतरी किलो चांदी जमा होऊन हे काम मार्गी लागेल, अन भक्ताला दान दिल्याचे पुण्यही लागेल, अन् संत नामदेव पायरीसह गाभारा चांदीने मढवला जाईल.