पनवेल विधानसभा मतदारसंघामधील मतदारांची संख्या वाढल्याने मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक मतदान केंद्राची जागा बदलल्याचा फटका मतदारांना बसला. मतदानाच्या पावतीवर पत्ता पारंपरिक मतदान केंद्राचा, प्रत्यक्षात मात्र नवीन केंद्राची तरतूद असल्याने नवीन केंद्राचा पत्ता शोधण्यात मतदारांना वेळ घालवावा लागल्याने पनवेलच्या मतदारांनी नाराजी व्यक्त केली. पनवेलच्या मतदान केंद्रातील २५ ईव्हीमशीन वापरात घेण्यापूर्वी तपासणीमध्ये दोषी आढळल्या. त्यामुळे केंद्रप्रमुख व नियंत्रकांनी तांत्रिक बिघाड झालेल्या ईव्हीमशीनच्या बदल्यात चांगल्या मशीन देऊन पुढील गोंधळ टाळला. शहरात सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत २९.१२ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांची नावे यादीमधून बेपत्ता झाल्याच्या तक्रारी या निवडणुकीमध्ये समोर आल्या नाहीत.
शहरातील ४२३ मतदान केंद्रांसाठी १ हजार पोलीस, एक राज्य राखीव दलाची तुकडी यावर चार उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे नियंत्रण असा फौजफाटा निर्भय मतदान प्रक्रिया पार पाडताना दिसला. आदर्श आचारसंहितेमुळे पनवेलमध्ये दोन्ही तगडय़ा राजकीय पक्षांचे चॅनेलवार पोलिसांच्या र्निबधांमुळे बंद होते. कळंबोलीमध्ये भाजपला पािठबा देणाऱ्या आत्माराम पाटील यांनी बेकायदा थाटलेले कार्यालय साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या आदेशानंतर मंगळवारी रात्री तातडीने बंद करण्यात आले.
त्यानंतर काही वेळानंतर कळंबोलीमध्ये माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासोबत फिरणाऱ्या मोटारींच्या ताफ्यांना प्रचार करू नये, अशी ताकीद कळंबोली पोलिसांनी दिल्याने या परिसरात काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मतदानाच्या दिवशी तालुक्यातून ८२ जणांना तडिपार केले आहे.
तसेच प्रतिबंधक कारवाईच्या ६८ आरोपींना साहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे साहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. गावागावांतील मुख्य सूत्रधार या जत्रेत सामील असल्याने गावांमध्ये निर्भय वातावरण निर्माण झाले.
खारघरमधील विजय पाटील याला एका दिवसाच्या तडिपारीचे आदेश असतानाही तो शहरात दिसल्याने पोलीस निरीक्षक विजय पांढरपट्टे यांनी त्याला मतदानाच्या दिवशी खारघर शहरात अटक केली. त्यामुळे काही वेळेसाठी खारघरमध्ये विजय पाटील हा पैसे वाटप करताना पकडल्याची अफवा पिकली होती. विजय पाटील खारघर ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता पाटील यांचे पती आहेत.
पनवेल परिसरातील गुजराथी विद्यालयातील मतदान केंद्रामध्ये मंगळवारी रात्री मतदान यंत्र ठेवलेल्या एका खोलीत सात फूट लांब साप शिरल्याने सुरक्षा यंत्रणेमध्ये एकच घबराट पसरली. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराम भोसले यांनी सर्पमित्राच्या मदतीने या सापाला पकडले. त्यानंतर मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचा जीव भांडय़ात पडला. मतदान प्रक्रियेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचा भत्ता मिळतो. त्याप्रमाणे मतदाना वेळी सुरक्षा पुरविणाऱ्या पोलिसांनाही निवडणूक भत्ता मिळावा, अशी मागणी पोलिसांकडून होत आहे.
अनेक पोलिसांची जेवणाची सोय राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे पाहायला मिळाले. राजकीय पक्षांची न्याहरी केल्यास पुन्हा या कार्यकर्त्यांवर वेळ पडल्यास दांडका कसा उगारायचा, असा पेच काही प्रामाणिक पोलिसांना पडल्याने त्यांनी दुपारचे राजकीय जेवण टाळले. बुधवार असल्याने अनेक राजकीय पक्ष चिकन बिर्याणीची पाकिटे कार्यकर्ते, पोलिंग एजंट, पोलीस, मतदारांना वाटताना दिसले.
कळंबोलीमधील १३१ क्रमांकाच्या मतदान केंद्राचा शोध घेत द. ग. तटकरे या मतदान केंद्रावर आल्या. हे त्यांचे तिसरे केंद्र होते. येथे आल्यावर त्यांचे मतदान केंद्र अजूनही भरपूर दूर महाराष्ट्र विद्यालयात असल्याचे समजल्यावर त्यांनी सरकारी यंत्रणेविरोधात आगपाखड केली.
या केंद्रावरील पोलिसांना महिलेने आपल्या मतदानाचे गुपित कथित केले. यावेळी चिडलेल्या या महिलेने पैसे मिळाले म्हणून मी मतदानासाठी धावत होते, आता मात्र धावायची ताकद पायात उरली नाही, असे म्हणून घराची वाट धरली.