केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास सहभागी न होणे आणि राज्यात अद्याप भूमिका स्पष्ट न करणे यामुळे विदर्भातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून आता कुठला झेंडा हाती घेऊ अशी त्यांची अवस्था झाली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती संपुष्टात आल्यानंतर विदर्भातील अनेक शिवसैनिक नाराज झाले होते. त्यातील काहींनी बंडखोरी करीत विविध पक्षातील उमेदवारांचा प्रचार केला. तत्कालीन जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते आणि नगरसेवक त्यांच्या पाठीशी होते. सावरबांधे यांना यश आले नाही. निवडणुकीमध्ये विदर्भात शिवसेनेला मिळालेला कौल बघता कार्यकत्यार्ंमध्ये पक्ष नेतृत्वाबाबत नाराजी असली तरी उघडपणे कोणी बोलायला तयार नाही. राज्यात भाजपला मिळालेले बहुमत बघता शिवसेनेने शर्ती व अटी न ठेवता सत्तेत सहभागी व्हावे, अशी अनेक कार्यकर्त्यांंनी इच्छा व्यक्त केली. मात्र, पक्ष नेतृत्वाने अजूनही कुठलाच निर्णय घेतलेलेला नाही, शिवाय केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असताना त्यातही शिवसेना सहभागी झाली नाही त्यामुळे आता कार्यकर्त्यांंमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून अनेकांनी पक्षात राहावे की दुसऱ्या पक्षात जावे या द्विधा मनस्थितीत आहे. विश्वासदर्शक ठरावादरम्यान काय निर्णय होतो याकडे विदर्भातील अनेक पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अनेकांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ भूमिका अवलंबिली आहे.
शिवसेनेचे प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून सतीश हरडे यांची नियुक्ती केल्यावरून शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सतीश हरडे मधल्या काळात काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी पुन्ही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना मध्य नागपुरात उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांंनी आता हरडे यांच्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात उप जिल्हाप्रमुख म्हणून किशोर कुमेरिया, राधेश्याम हटवार आणि अनिल नगरारे असताना हरडे यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुख जबाबदारी का देण्यात आली? असा प्रश्न अनेक कार्यकत्यार्ंनी उपस्थित केला. शिवाय सुरज गोजे आणि मंगेश काशीकर यांच्याकडे शहर प्रमुख जबाबदारी आहे त्यामुळे त्यांना डावलण्यात आले आहे. पक्षात अनेक वर्षांपासून निष्ठावान म्हणून काम करणाऱ्या कार्यकत्यार्ंना सन्मान होत नसल्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंनी नाराजी करीत तूर्तास ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ ची भूमिका स्वीकारली आहे.