तुभ्रे हनुमाननगर येथे बुधवारी रात्री तडा गेलेली दुमजली घराची भिंत शेजारच्या घरावर पडून पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. यात तीन लहान मुले एक तरुण व एक महिलेचा समावेश आहे. त्यांच्यावर वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयदीप हिरवे (६), नताशा हिरवे (८), रितेश हिरवे (६), सुभाभाई हिरवे (६५), शुभम लाडके (२२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हनुमान नगर बुद्धविहारनजीक हिरवे कुटुंबीयांचे घर आहे. त्यांच्या शेजारी संगीता वेडे यांचे दुमजली लोडबेरिंगचे घर आहे. दोन वर्षांपूर्वी या घराच्या भिंतीला तडे गेले होते. तेव्हापासून ते शिळाफाटा या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र बुधवारी दुपारी पुन्हा एकदा या भिंतीला तडे गेले. याबाबत संगीता वेडे यांना कळविलेदेखील होते. पण रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जेवण करून हिरवे कुटुंब झोपण्याच्या तयारीत असताना या घराची भिंत हिरवे यांच्या घरावर कोसळली. त्याचवेळी घराच्या जवळून जाणारा शुभम लाडके हादेखील या दुर्घटनेत जखमी झाला.