प्लास्टर ऑफ पॅरिसची अवजड, उंच गणेशमूर्ती..सजावटीसाठी रस्त्यांवर थाटलेले मंडप..विद्युत रोषनाईचा झगमगाट..डिजे, डॉल्बीचा धणधणाट..रात्रीच्या वेळी गणपतीच्या मंडपात चालणारे जुगाराचे डाव..मिरवणुकांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि विसर्जनामुळे तलाव, खाडीत होणारे प्रदूषण. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे चित्र नेहमीच पाहावयास मिळते. पर्यावरण संवर्धनाला अग्रक्रम देऊन ऊत्सव पाळा, या आवाहनाला केराची टोपली दाखवत उत्सवांच्या झगमगटाला प्राधान्य देण्यात मश्गूल असणाऱ्या अशा मंडळांना देणगीसाठी यापुढे दारात ऊभे करायचे नाही, असा निर्णय ठाण्यातील सुजाण रहिवाशांनी घेतला असून त्यासाठी काही संस्थांच्या माध्यमातून ही मोहीम ऊभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था या मोहिमेच्या केंद्रस्थानी असून शहरातील आणखी काही संस्थांनी यामध्ये भाग घ्यावा, असे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून या उत्सवाचे विद्रुपीकरण होऊ लागल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाकरिता कारणीभूत ठरणारे अनेक प्रकार गणेशोत्सवाच्या निमित्ताने घडू लागले आहेत. उत्सवांच्या या विद्रुपीकरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून ठाण्यातील सामान्य नागरिकांनी या विरोधात ऊभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यातील वेगवेगळ्या संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला असून अशाच संस्थांपैकी एक असलेल्या समर्थक भारत व्यासपीठ या संस्थेने सुरू केलेल्या मोहिमेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करणार असला तरच देणगी मागण्यासाठी या, अशा स्वरूपाचे म्हणणे मांडणारी मोहीम या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या संस्थेने रहिवाशांसोबत संवाद साधत या उपक्रमाची सुरुवात केली आहे. संस्था जनजागृती करणाऱ्या स्टिकर्सची निर्मिती करत असून ठाण्यातील प्रत्येक घराच्या दारावर हे स्टिकर्स चिकटवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
नागरिकांचा पुढाकार
सामाजिक संस्थांनी सुरू असलेल्या उपक्रमांमुळे लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली असून ही एक आगळीवेगळी संकल्पना पुढे आली आहे. नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्याकडून या स्टिकर्ससाठी मोठी मागणी येत आहे. नागरिकांनी पुढाकार घेतला असून आमच्या संस्थेच्या वतीने त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून हे स्टिकर्स घरोघरी पोहोचवले जाणार असल्याचे समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास कार्ले यांनी सांगितले.    
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव म्हणजे नेमके काय?
ठाण्यातील नागरिकांनी घराच्या दारांना चिकटवलेल्या स्टिकर्सवर पर्यावरण स्नेही गणेशोत्सवास देणगी देणार असल्याचे दर्शविले असले तरी त्याचबरोबर पर्यावरणस्नेही गणेशोत्सव म्हणजे नेमके काय याची माहितीही रहिवाशांना दिली जात आहे. शाडूच्या मातीची कमी उंचीची मूर्ती, निर्माल्याचा पुनर्वापर, पर्यावरणस्नेही सजावट, देणगीतून सामाजिक उपक्रमांचे आयोजन, विजेचा आवश्यक तेवढा आणि मर्यादित वापर, डिजे, डॉल्बी आणि स्पिकर्सचा वापर टाळून ध्वनी टाळणे, मिरवणुकीतून कोणालाही त्रास नको आणि कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन अशा अटी ठाणेकरांनी आता गणेश मंडळांसमोर ठेवल्या असून या अटी मान्य असतील तरच देणगी मिळेल असा सूर या मोहिमेद्वारे लावण्यात आला आहे.