परभणी शहर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षाच्या निवडीत एकमेकांसमोर शड्डू ठोकणारे राष्ट्रवादी व काँग्रेस सोमवारी प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत एकत्र आले. या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी होऊन दोन प्रभाग समित्या राष्ट्रवादीला मिळाल्या, तर एका प्रभाग समितीवर काँग्रेसचे नगरसेवक विराजमान झाले.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे प्रताप देशमुख महापौर सज्जुलाला उपमहापौर व स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून विजय जामकर कार्यरत आहेत. महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांविरोधात उतरले होते. राष्ट्रवादीला ३० जागा मिळाल्या. परंतु स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. काँग्रेसने २३ जागाजिंकल्या. त्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. काँग्रेसने महापौर तुमचा उपमहापौर आमचा असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे दिला. परंतु राष्ट्रवादीने काँग्रेसचा हा प्रस्ताव धुडकावत भाजपचे दोन व अपक्ष एक नगरसेवकाला सोबत घेऊन महापौर व उपमहापौरपदाची लढाई सहज जिंकली. शिवसेना तटस्थ राहिली. स्थायी समिती अध्यक्षाच्या निवडीतही राष्ट्रवादीने काँग्रेसला धोबीपछाड दिली.
शहरात स्थापन करण्यात येणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदासाठी पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादी आमनेसामने आले. प्रत्येक प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादीने आपल्या नगरसेवकांचे नामनिर्देशपत्र दाखल केले. अ, ब, क अशा प्रभाग समित्या स्थापन होणार होत्या. क मध्ये राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत आहे, तर अ व ब मध्ये काँग्रेसला सभापतिपद मिळविण्यासाठी शिवसेनेची मदत लागणार होती. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तडजोडीत या तिन्ही प्रभाग समितीचे सभापती बिनविरोध निवडून आले.
अ मध्ये राष्ट्रवादीच्या रझिया बेगम म. युनूस व क मध्ये सचिन देशमुख, तर ब मध्ये काँग्रेसचे मुखीमोद्दीन मैनोद्दीन निवडून आले. सभापतिपदाच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे होते. त्यांना आयुक्त सुधीर शंभरकर, प्रभारी नगरसचिव चंद्रकांत पवार यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित सभापतींचे महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जूलाला, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय जामकर आदींनी स्वागत केले.