ठाणे महापालिका मुख्यालयाजवळच असलेल्या पाचपाखाडी भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून या पाण्याचा घाणेरडा वासही येत आहे. या पाण्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही महापालिका प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. तसेच या संदर्भात महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना थांगपत्ताही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयाजवळच असलेल्या पाचपाखाडी भागात गुरुकुल सोसायटी, नामदेववाडी, उदयनगर, देवऋषीनगर, संत ज्ञानेश्वर पथ, खळे कंपाऊंड आणि सव्‍‌र्हिस रोड असा परिसर येतो. या भागात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती असून या परिसरात ठाणे महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून सव्‍‌र्हिस रोडजवळ असलेली गृहसंकुले आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील रहिवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याचा रंग सांडपाण्याप्रमाणे असून त्याचा घाणेरडा वासही येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असतानाही महापालिका प्रशासनाचे त्याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पाचपाखाडी भागापासून हाकेच्या अंतरावरच महापालिकेचे मुख्यालय आहे. मात्र तरीही या प्रकाराबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना गंधही नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. तसेच या प्रकारामुळे येथील रहिवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान, पाचपाखाडी भागात होणाऱ्या दूषित पाण्याविषयी महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली. या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश मेहेंदळे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच नौपाडा प्रभाग समितीमधील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विनोद पवार यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता, या संदर्भात आमच्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. मात्र आज या भागाचा पाणीपुरवठा बंद असल्याने या प्रकाराबाबत उद्या तपासणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.