ठाणे महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गुरुवारी तलाव सुशोभीकरण, पाणी दरवाढ, शहर नियोजनासंबंधी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असतानाच प्रेक्षक गॅलरीतील छतातून दुपारी अचानक  पाण्याच्या धारा वाहू लागल्या. त्यामुळे प्रेक्षक तसेच महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सभागृहात अचानक गंगा अवतरल्यामुळे छत कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रेक्षकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांना महत्त्वाच्या चर्चेपासून वंचित राहावे लागल्याचे दिसून आले.
 सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावर शहर नियोजन, एमआयडीसी पाण्याचे वाढीव दर, तलाव सुशोभीकरण, परवडणारी घरे असे महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या मार्च महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे या सभेतील चर्चा ऐकण्यासाठी शहरातील नागरिकांनी सभागृहात मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती. दरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवक महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करत असतानाच दुपारी अचानक हा प्रकार घडला.
या घटनेने नगरसेवक, नागरिक आणि पत्रकारांचे लक्ष विचलित झाले. त्यानंतर सभागृहात गंगा अवतरल्याची चर्चा रंगली.  सायंकाळी सर्वसाधारण सभा संपेपर्यंत पाण्याच्या धारा सुरूच होत्या. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या पाण्याच्या धारेखाली बादली आणि टाक्या ठेवल्या होत्या. चार ते पाच बादल्या भरल्यानंतर त्या रिकाम्या करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती.
तसेच गॅलरीत साचलेले पाणी कपडय़ाने काढण्याचेही काम सुरू होते. महापालिकेचे अधिकारी वर्गही अचानकपणे वाहू लागलेल्या गंगेचे मूळ शोधण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.
वातानुकूलित यंत्रणेत बिघाड
वातानुकूलित यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यामधील पाणी छतातून बाहेर येऊ लागले. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.  या घटनेप्रकरणी सभागृहातील काही नगरसेवकांनी तसेच नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली.