घराबाहेर असताना तहान भागवण्यासाठी पाण्याचे पाऊच विकत घेणे नागरिक पसंत करतात. उन्हाच्या तडाख्यासोबत पाऊच व बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, अशा पाऊचमध्ये दीर्घकाळ साठवलेले पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 शहरातील बसस्थानक, पानटपऱ्या, उपाहारगृह, चित्रपटगृहासह गर्दीच्या ठिकाणी पाण्याच्या पाऊचची सर्रास विक्री होत असते. अडीच ते तीन रुपये किंमतीचा पाऊचचा पर्याय बहुतेक नागरिकांच्या अंगवळणी पडला आहे. पाकिटातील पाण्याचा मोह हा विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतो. या पाण्याला प्लास्टिकचा गंध येत असल्याने ते प्यावेसे वाटत नाही. असे असतानाही त्याचा वापर फार मोठय़ा प्रमाणात केला जातो. पॅकिंगच्या तारखेपासून एक महिन्यापर्यंत पाणी चांगले राहू शकते, अशी सूचना काही पाऊचवर असते. मात्र, नेमकी पॅकिंगची तारीख नसल्यामुळे पाऊच किती दिवसांपूर्वीचे आहे, हे कळायला मार्ग राहात नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊन आरोग्याच्या तक्रारीला सामोरे जावे लागते.  पाणी र्निजतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन पाऊचमध्ये काही दिवसांपर्यंत काम करीत असते. त्यामुळे खूप दिवसाचे पाणी शुद्ध असते असे नाही. पाऊचमधील शिळ्या व अशुद्ध पाण्यामुळे डायरिया, टायफाईडसारखे साथीचे आजार होऊ शकते. पाऊचमधील पाणी थंड असते. त्यामुळे नागरिकांना तहान भागवण्यासाठी या पाण्याचे आकर्षण असते. मात्र पाणी पाऊच किती दिवसांपूर्वीचे आहे, हे ओळखणे कठीण असते. त्याबाबत बारकाईने लक्ष देऊनच विकत घेणे चांगले असते. त्यामुळे नागरिकांनी पाऊचचे पाणी पिण्याचा मोह टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अशा पाऊचच्या पाण्याचे नमुने घेऊन खराब पाणी विकणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.