कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई असताना टिटवाळ्यात मात्र पालिकेच्या जलवाहिन्यांमधून भूमाफिया अनधिकृत चाळी, बांधकामांसाठी चोरून नळजोडण्या घेत आहेत. जलवाहिन्यांना सातत्याने खासगी प्लम्बरकडून भोके पाडण्यात येत असल्याने टिटवाळा परिसरातील रस्ते, गल्ल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. या गळती व पाणी चोरीकडे पालिका अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. या पाणीचोरी व गळतीविषयी उघडपणे आवाज उठविला तर भूमाफियांकडून त्रास होण्याच्या भीतीने कोणीही रहिवासी याविषयी उघडपणे बोलत नसल्याचे सांगण्यात येते.
टिटवाळा, मांडा परिसरात भूमाफियांकडून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत चाळी, इमारतींची बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना पालिका अधिकृतपणे नळजोडणी देत नसल्याने भूमाफिया खासगी प्लम्बरच्या साहाय्याने जलवाहिनीला भोकपाडून आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठा करून घेतो. अशा प्रकारे जलवाहिन्यांवर सातत्याने भोक पाडण्यासाठी ठाकठोक सुरू असल्याने पाणीगळती सुरू होते. पालिका अधिकारी, कर्मचारी भूमाफियांबरोबर संगनमत करून वावरत असल्याने या बेकायदेशीर कामांकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येते अशी माहिती आहे.
सरनौबतनगर, सावरकर नगर, स्वामी समर्थ मठ, गणपती मंदिर चौक, बौद्धवाडा, रेल्वे पॉवर हाऊस भागांत गेल्या काही महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणात जलवाहिन्यांमधून गळती सुरू आहे. तात्पुरती डागडुजी करून ही गळती थांबविण्याचा पालिका कर्मचाऱ्यांचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. पाणीपुरवठा विभागात पुरेसा कर्मचारी नसल्याने गळती थांबविण्याचे काम विलंबाने होत आहेत. ही गळती कायमस्वरूपी थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्याने सांगितले.