पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या जिल्ह्य़ातील ९ ग्रामपंतायतींना प्रती ५ लाख रुपये किमतीचे जलशुद्धीकरण यंत्र बसवून देणार असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेवर ४५ लाख ९१ हजार ३०० रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली असून त्यात जिल्ह्य़ातील विविध विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. कुही तालुक्यातील वेलतूर, मोदा तालुक्यातील वाकेश्वर व नेरला, सावनेर तालुक्यातील दहेगाव रंगारी, हिंगणा तालुक्यातील अमरनगर व कवडस, नागपूर तालुक्यातील लाव्हा, रामटेक तालुक्यातील बोथीया व काटोल तालुक्यातील मेंढेपठार या ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरण यंत्र देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. देखभाल दुरुस्तीअंतर्गत ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांसाठी ४९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय मौदा, सावनेर व काटोल तालुक्यातील झिल्पा, खुर्सापार, महालगाव, टाकळी, भंसाळी, कोहळी बेनवा, माळेगाव या आठ ग्रामपंचायतींसाठी १९८ विद्युत खांब लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. महापालिकेत समाविष्ट झालेल्या १७ पैकी १४ भाडय़ाच्या खोलीत असलेल्या अंगणवाडय़ाच्या भाडे सेसफंडातून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहाच्या नूतनीकरणानंतर सभागृहात ४ लाख ३८ हजार रुपये खर्चातून विप्रो व गोदरेज कंपनीच्या ५६ खुच्र्या बसविण्यात येणार आहे. बेरोजगार सेवा संस्थेच्या माध्यमातून ४ चतुर्थश्रेणी कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केले जाणार असून या चारही कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची कामे वाटून देण्यात येईल. चारही कर्मचाऱ्यांना गणेवश देणार असल्याचे संध्या गोतमारे यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्य़ातील गाव रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जात होते मात्र आता बांधकाम विभागाकडे न देता जिल्हा परिषद स्वत:च रस्त्याची कामे करणार आहेत.