शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर मृत जलसाठय़ाचा वापर करण्याची योजना महापालिकेने तयार केली आहे. मात्र प्रस्तावित कामासाठी एकही ठेकेदार पुढे न आल्याने जळगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. काही गावांमध्ये तर तहान भागविणार कशी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर नदीच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने पावसाळा संपला तरी धरणात केवळ चार टक्के पाणीसाठा होऊ शकला. शहराची तहान भागविण्यासाठी धरणातून पाणी घेणे सुरूच असल्याने उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आला आहे. त्यामुळे शहरासाठी आधी एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दिवाळीनंतर दोन दिवसाआड तर जानेवारीपासून तीन दिवसाआड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी धरणातील मृत जलसाठय़ाचा वापर करण्याची योजना महापालिकेने मागील महिन्यात आखली. त्यासाठी जीवन प्राधिकरण मार्फत प्रस्ताव तयार करण्यात आला. एक कोटी ६६ लाख रूपयांच्या या योजनेस पालकमंत्री गुलाब देवकर यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली. ही योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्राधिकरण मार्फतच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी भुसावळ, नाशिक व बुलढाणा येथील ठेकेदारांनी निविदा अर्ज खरेदी केले होते. ३० जानेवारीपर्यंत संबंधित अर्ज महापालिकेत जमा होणे अनिवार्य होते. पण एकाही ठेकेदाराची निविदा मुदतीत दाखल झाली नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी जाणारा वेळ, निविदा दाखल होणे व प्रत्यक्ष कामाला सुरूवात, यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत धरणातील खालावलेले पाणीही जळगांवकरांना मिळणे मुश्किल असल्याचे चित्र सध्या आहे.