राज्यातील सर्वाधिक धरणे असूनही ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात मात्र पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्य़ातील एकूण शेतजमिनीच्या क्षेत्रांपैकी दोन टक्केही जमीन सध्या ओलिताखाली नाही. राजकीय नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे जिल्ह्य़ात उपलब्ध असलेल्या मुबलक पाणीसाठय़ाचा उपयोग सिंचनासाठी झालेला नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी देवाकडे धावा करण्याची वेळ आली आहे.
बारमाही पाणीसाठा असणाऱ्या तब्बल बारा नद्या ठाणे जिल्ह्य़ात आहेत. त्यामध्ये वैतरणा, उल्हास, काळू, पिंजाळ, देहेर्जे, सूर्या, तानसा, गारगावी, भातसा, बारवी अशा नद्यांचे जाळे संपूर्ण जिल्हाभर पसरले आहे. या सर्व नद्यांवर लहान-मोठी धरणे, बंधारे बांधण्यात आली आहे. मात्र या धरणातील केवळ ५ टक्के पाणीही धरण परिसरातील शेतकऱ्यांना मिळालेले नाही. धरण परिसरातील शेती कोरडी आहेतच, शिवाय पिण्यासाठीही येथील ग्रामस्थांना दाहीदिशा वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्य़ातील उपलब्ध धरणातील पाणीसाठय़ाच्या केवळ २० टक्के पाणीसाठा येथील शेतकऱ्यांना उपलब्ध झाले तर येथील सिंचन क्षेत्रात २५ ते ३० टक्क्यांची वाढ होऊ शकली असती. यंदाची परिस्थिती अत्यंत बिकट बनली असून पावसाने हजेरी लावून पाठ फिरवली आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याने पेरण्या वाया जाऊ लागल्या आहेत. पेरलेल्या धान्याला कोंब फुटण्याआधीच कडक उन्हामुळे भाताचा दाणा सुकून गेला आहे. महागडी बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु पावसाच्या दांडीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सुमारे ९९ टक्के भातशेती पावसावर अवलंबून आहे.