पावसाने दडी मारल्याने टंचाईच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाला नव्याने नियोजन करावे लागत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या पाणी नियोजनानुसार पालखेड धरणातून मनमाडसाठी अजून आठ दिवस पाणी सोडले जाणार नाही. धरणातील जलसाठा अजून ६० दिवस पुरवावे लागणार आहे. जूनअखेरीस धरणातून पाणी सोडणे अपेक्षित असताना महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने आता हे पाणी १० जुलैनंतर सोडण्यात येण्याची शक्यता आहे. मनमाडला सध्या २६ दिवसांआड नळ पाणी पुरवठा होत असून पालखेडचे पाणी लवकर मिळण्याची शक्यता नसल्याने या कालावधीत अधिकच वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आधीच टंचाईला तोंड देणाऱ्या मनमाडकरांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे.
शहराला जेमतेम पाच-सहा दिवस पुरेल इतपतच जलसाठा सध्या वाघदर्डी धरणात शिल्लक आहे. पाऊस नसल्याने ८० टक्क्यांपेक्षा अधिक कुपनलिका आटल्या आहेत. बहुतांश विहिरींची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे सेवाभावी संस्था आणि संघटनांकडून होणाऱ्या १२-१३ टँकर्सवरील पाणीपुरवठय़ावर सध्या शहराची भिस्त अवलंबून आहे. अजून काही दिवस पाऊस न आल्यास टँकरव्दारे होणाऱ्या पाणीपुरवठय़ावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रशासकीय यंत्रणाही हादरली असून नव्याने पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची सूचना केली आहे. यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली असल्याने प्रशासन कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. पालखेड धरणातील पाणी १५ ऑगस्टपर्यंत पुरविण्याच्या दृष्टिने पाणी सोडण्याचे नियोजन आखण्यात येत आहे. मनमाड व येवला शहराला होणाऱ्या पाणी पुरवटय़ावर याचा अधिक परिणाम जाणवणार आहे. नांदगावला गिरणा धरणातून पाणी पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
टंचाईच्या काळात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत असले तरी जनावरांची तहान कशी भागवावी हा प्रश्न पशूपालक आणि प्रशासनापुढे आहे. यापुढे धरणातून पाणी सोडण्यात आल्यावर कालव्यातून जाणाऱ्या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी शेतीला देण्यासाठी पाणी चोरी केल्यास पंप जप्तीबरोबरच वीजपुरवठा खंडित करणे, पाणी परवानगी रद्द करणे अशा प्रकारची कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पोलीस, पाटबंधारे, वीज कंपनी आणि महसूल अधिकारी यांच्या पथकाला कार्यरत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
टंचाईमुळे दिवसेंदिवस ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट होणार असल्याने पोलिसांवरील ताण वाढणार आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जनतेचे सहकार्य पोलिसांना अपेक्षित आहे.