जून महिना कोरडाच गेल्याने शेतीला सोडाच पण पिण्याच्या पाण्याचीही वणवा जाणवू लागल्याने १९७२ च्या भीषण दुष्काळाची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उपलब्ध असलेले पाण्याचे साठे जपण्याची तसेच थेंब थेंब पाणी जपून वापरण्याची गरज असताना पाणीचोरी आणि गळतीकडे पाणीवाटप करणाऱ्या आस्थापनांनकडून दुर्लक्ष होत असल्याने चित्र आहे. वाढत्या औद्योगिक तसेच नागरीकरणासाठी पाणी ही आवश्यक बाब असून पाणीपुरवठा करणाऱ्या आस्थापनांकडून जाणीपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने तसेच आपल्या फायद्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार करीत आस्थापनातीलच घरभेदी व्यावसायिक, बडे बांधकाम व्यावसायिक तसेच राजकारणी मोठय़ा प्रमाणात पाणीचोरी करीत असल्याने सर्वसामान्यांना त्याचा भरुदड भरावा लागत आहे.
पाणीसाठा कमी असल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या विभागांनी पाणीपट्टीतही वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळालेले आहे. त्यामुळे पाणी चोरीवर नियंत्रण आणल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. उरण तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. औद्योगिकदृष्टय़ा उरण तालुक्याचा विस्तार होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन पाण्याची तसेच उद्योगांसाठी मोठय़ा प्रमाणात लागणाऱ्या पाण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे. सद्य:स्थितीत उरण परिसरात एमआयडीसीचे रानसई धरण, रायगड जिल्हा परिषदेच्या लघु पाठबंधारे विभागाचे पुनाडे धरण, त्याच प्रमाणे सध्या अनेक गावांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. जेएनपीटीसारख्या बंदराला व कामगार वसाहतीत स्वतंत्रपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायती तसेच वाडय़ांना व तीस हजाराची लोकसंख्या असलेल्या उरण शहराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. याच्याच जोडीला रानसई धरण खास करून ज्या कारणासाठी उभारण्यात आलेले होते. त्या औद्योगिक विभागातील उरणमधील नौदल तसेच ओएनजीसी प्रकल्पाला रानसईमधून पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या तीस किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून येत आहेत. या जलवाहिन्यांना जाणीवपूर्वक छिद्र पाडून त्यातील पाणी शेतात किंवा तलावात साठवून ठेवून नंतर ते पाणी पंपाच्या साहाय्याने टँकरद्वारे खासगी व्यावसायिकांना पुरविले जात आहे.
उरण शहर तसेच ग्रामपंचायतींच्या परिसरात बेकायदा नळ जोडण्या देऊन अनेक राजकारणी पाणीचोरी करीत आहेत. शहरातील बिल्डरांना बेकायदा पाणी देण्याचेही प्रकार घडत आहेत. याच बरोबरीने नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणाच्या पाण्याचीही अनेक ठिकाणी चोरी केली जात असून एका ठिकाणी तर मुळे जलवाहिनीलाच पाण्याचा टँकर लावून राजरोसपणे पाणीचोरी केली जात आहे. त्याच प्रमाणे उरण तालुक्यातील दहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातील पाझर तलाव विहिरीशेजारून टँकर लावून येथील औद्योगिक परिसरातील बांधकाम तसेच इतर कामांसाठी पाण्याची चोरी केली जात आहे. या सर्व ठिकाणी पाणीचोरी होत असल्याचे आस्थापनातील अधिकाऱ्यांना माहीत असतानाही अधिकाऱ्यांशी पाणीचोरीसंदर्भात विचारणा केली असता अशा कोणत्याही प्रकारची पाणीचोरी होत नसल्याचे मत व्यक्त केले जाते. पाणीपुरवठा करताना गळतीही ग्राह्य़ धरण्यात आल्याचा मुलामा देत पाणीचोरी झाकण्यासाठी प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.