मुळा धरणातून जायकवाडीत मराठवाडय़ासाठी सोडलेल्या पाण्याने गुरुवारी वेग घेतला. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पाणी कायगाव टोका येथे पोहोचले. दुसरीकडे दुपारी १२ वाजता भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले. सुमारे २१० किलोमीटर अंतर कापून हे पाणी जायकवाडीत पोहोचण्यास तीन दिवस लागतील. दोन धरणांतून पाणी झेपावले असले, तरी दारणा धरणातून मात्र दिवसभरात पाणी सोडले गेले नव्हते. वरच्या भागात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे पाण्याची वाट खडतर बनल्याचे चित्र गुरुवारी दिवसभर तयार झाले होते. मध्यरात्री अथवा पहाटेस दारणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
मराठवाडय़ाला पाणी देण्यास नगर व नाशिक जिल्हय़ांतील नेत्यांनी कडाडून विरोध चालविला आहे. तथापि पिण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने ९ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पाणी सोडताना विरोध होऊ शकतो, असे लक्षात आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. मुळामधून सोडलेले पाणी गुरुवारी दुपारी जायकवाडी जलाशयात पोहोचण्यास प्रारंभ झाला. भंडारदरा धरणातून दुपारी १२ वाजता ६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. या धरणातून तीन टीएमसी पाणी जायकवाडीत येण्यास ७५ ते ८० तास लागतील. दारणातून केव्हा पाणी सुटेल, याची निश्चित माहिती अधिकाऱ्यांनाही नव्हती. तथापि तेथून पाणी सोडल्यास २२५ किलोमीटरचे अंतर पाण्याला कापण्यासाठी तीन ते साडेतीन दिवस तरी लागतील. त्यामुळे रविवारपर्यत पाण्याचा ओघ सुरू राहण्याची शक्यता आहे. पाण्याचा वेग लक्षात घेता उद्या (शुक्रवारी) जायकवाडीच्या पाणी पातळीत काहीअंशी वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडय़ासाठी जायकवाडी जलाशयात पाणी सोडण्याच्या निणर्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. तथापि एका खोऱ्यातील धरणात समान जलपातळी असावी या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे.