सभेवर झालेल्या दगडफेकीचा संदर्भ देऊन पाठीमागून वार करू नका, हिंमत असेल तर समोरासमोर या, जशास तसे उत्तर देऊ असे आव्हान राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी आमदार अनिल राठोड यांना दिले.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या बागडपट्टीत राष्ट्रवादीच्या शाखेचे उदघाटन काकडे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, युवक प्रदेश उपाध्यक्ष योगेश जगताप, आदी या वेळी उपस्थित होते. या सभेच्या सुरुवातीलाच येथे दगडफेक झाल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली असून ती स्थानिक आमदारानेच केल्याचा आरोप काकडे यांनी नंतर  केला. मात्र याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही.
काकडे यांनी या वेळी राठोड यांनाच लक्ष्य केले. ते म्हणाले, आमची संस्कृती नम्रतेची आहे, गुंडगिरीची नाही. विकासावरच राष्ट्रवादीचा विश्वास असून खासदार दिलीप गांधी व आमदार अनिल राठोड यांना त्यांनी नगर शहरासाठी किती निधी आणला याचा हिशोब विचारला पाहिजे. शहराची सत्ता एकदा राष्ट्रवादीच्या हातात द्या, शहराचा कायापालट करून दाखवू असे काकडे म्हणाले.
संग्राम जगताप यांनीही या वेळी राठोड यांच्यावर टीका केली. हा त्यांचा नव्हेतर दिलदार बीर यांचा बालेकिल्ला आहे असे ते म्हणाले. उड्डाणपुलाच्या कामात आमदार राठोड यांनीच अतिक्रमणाच्या नावाखाली खोडा घातल्याचा आरोप त्यांनी केला. अविनाश घुले यांनी आपण व जगताप यांच्यामध्ये कोणतेही वाद राहिले नसल्याचे स्पष्ट केले.
पक्षाचे शहर सरचिटणीस बीर यांनी आमदार राठोड यांनी मंडळावर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. आमच्या मंडळामुळेच ते आमदार झाले असे ते म्हणाले. शरद क्यादर, नामदेव जगताप, अरविंद शिंदे, आदींची या वेळी भाषणे झाली. रमेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.