महापालिकेतील नोकरभरतीच्या संचिकांना आग लागली की लावली, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांबरोबर दूरध्वनीवर चर्चा झाली. तथापि, त्यांनी अजून चौकशीस होकार दिला नाही. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्याची पाहणी केली जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पंख्याला आग लागून तो खाली पडला व त्यामुळे संचिकांनी पेट घेतला. मध्यरात्री पंखा चालू होता का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली की नाही या विषयी शंका असल्याने चौकशी करून कारवाई केली जाईल, असे महापौर कला ओझा यांनी बुधवारी सांगितले. लाड समिती व अनुकंपा तत्त्वावरील ७९ प्रकरणांची बारकाईने चौकशी सुरू आहे. सोमवारी रात्रीच्या आगीत २०० ते २२५ संचिका जळाल्या असाव्यात, असे अधिकारी सांगतात.
दरम्यान, या घटनेमुळे अग्निशामक दल व आस्थापना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिस देण्यात आल्या. त्यांच्याकडूनही खुलासे मागविले आहेत. आगीसंदर्भात पोलिसांनी पंचनामा केला असून घडलेल्या प्रकाराबाबत अहवाल मागविला आहे. दोषी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे महापौर ओझा यांनी स्पष्ट केले. वादग्रस्त प्रकरणांच्या संचिका गायब होणे महापालिकेत नेहमीच घडत असते. संचिकांमधील कागदपत्रे संगणकावर स्कॅन करून घ्यावीत, तसेच ई-प्रणालीचा वापर करावा, या राज्य सरकारच्या सूचनांना केराची टोपली दाखविल्याने ज्यांना संचिका गायब करायच्या असतात, त्यांचे फावते असे अधिकारी आवर्जून सांगत आहेत. या प्रकरणाची चौकशी कोण करणार, हे अद्याप ठरलेले नाही.
अतिक्रमण मोहीम थांबली
फुलेनगर ते एकता चौक रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास गेलेल्या पथकाला नागरिकांनी विरोध केला. या रस्त्यावरील १० अतिक्रमणधारकांपैकी शाहीन अंजुम व दाणेकर यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत अतिक्रमण पाडणाऱ्यांना थांबविले. त्यामुळे ही मोहीम एक दिवस थांबविण्यात आली.