अन्न सेवन करण्याकडे आज शास्त्रीय दृष्टीने पाहिले जात नसून वेळी अवेळी जेवण तसेच जंक फूडमुळे आपणच आपल्या शरीराची हानी करीत असतो, असे मत आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांनी व्यक्त केले. शरीराला वाढीसाठी आवश्यक घटक न मिळाल्याने आज चाळिशीतच अनेक आजार उद्भवल्याचे दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अक्षरधारा, राजहंस प्रकाशन, तेजज्ञान फाऊंडेशन आणि मांडके हिअरिंग सव्र्हिसेस आयोजित ४६० व्या मायमराठी शब्दोत्सवात ‘जंक फूड की स्वास्थ्य सौंदर्य?’ या पुस्तकाच्या निमित्ताने आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम काल सायंकाळी ६.०० वाजता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार जयश्री देसाई यांनी मालती ताईंशी संवाद साधत शरीरास पोषक अन्न कोणते, ते सेवन करण्याच्या पद्धती आदींविषयी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या मुलाखतीच्या माध्यमातून साधता आले.
यावेळी मालतीताईंनी जंक फूड म्हणजे अडगळीचे पदार्थ की ज्याच्या सेवनाने शरीराला हव्या असणाऱ्या कॅलरी मिळत नाहीत असे सांगितले. आपण रोज खात असलेली पोळी-भाजी ही जंक फूड असल्याचे सांगितले. पोळी आणि उसळ यांच्या सेवनाने शरीराला आवश्यक असलेली प्रोटिन्स मिळतात. याबरोबरच आहारात दही, ताक हवे. तसेच पूर्वापार चालत आलेले वरण, भात, तूप, लिंबू या सेवनाने आवश्यक असणाऱ्या कॅलरीज आपल्याला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपला रोजचा नाष्टा कोणताही असो त्या जोडीला दूध आवश्यकच आहे.
सॅलड, पालेभाज्या, भाकरी या पदार्थातूनही प्रोटिन्स आपल्याला मिळतात. वय वर्षे ४० पर्यंत घेतलेला आहार आपल्याला पुढील आयुष्यात उपयोगी ठरतो. व्हिटामिन ए. डी. ई. शरीराला जास्तीत जास्त आवश्यक आहेत. परंतु आपल्याकडे स्त्रियांना, मुलींना ही प्रोटिन्स मिळत नाहीत, कारण दूध सेवन करण्यासाठी स्त्रियांना दूधच शिल्लक राहात नाही. त्या आधी कुटुंबाच्या गरजा पूर्ण
करतात, मगच आपल्याकडे लक्ष देत असल्याने त्यांना पोषक आहार मिळत
नाही. मग होणारे अपत्यही व्यवस्थित जन्माला येईलच ही शाश्वती नसते. ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.