फळ पिकांना लागू असलेली हवामानावर आधारित पीक विमा योजना पुढील वर्षांपासून राज्यात सर्वच पिकांना लागू करण्यात येणार आहे, असे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबतचा प्रश्न आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानसभेत मांडला. किती शेतक ऱ्यांचे पंचनामे झाले, किती रकमेचे त्यांना वाटप करण्यात आले, अशी विचारणा त्यांनी केली. भरपाईसाठी वाढीव यादी करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई झाल्याचा आरोप त्यांनी केला. जवळपास सर्वच पंचनामे करण्यात आले आहेत, परंतु लातूर जिल्ह्य़ातील १२ गावातील शेतकऱ्यांच्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचे प्रस्ताव उशिरा आल्याने मदत वाटपास विलंब झाला. २ हजार ७३ शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे, असे कृषी राज्यमंत्री संजय सावकारे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत धोरणात्मक विचार करण्याची मागणी आमदार नाना पटोले यांनी केली. या सूचनेबाबत विचार केला जाईल, असे कृषीमंत्री म्हणाले. जानेवारी व फेब्रुवारी २०१३ मध्ये राज्यात अवेळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती पिके व फळपिकांच्या क्षेत्रासाठी शासनाच्या निर्णयानुसार ५३ कोटी, ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील वर्षांपासून सर्वच पिकांना हवामान आधारित पीक विमा योजना लागू केली जाईल, असे कृषीमंत्री विखे-पाटील म्हणाले.